बेळगाव-बेंगळूर विशेष फेरीला तुफान प्रतिसाद
बेळगाव : बेळगाव-बेंगळूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने शनिवारी रात्री बेळगाव-बेंगळूर विशेष रेल्वेगाडीची घोषणा केली आणि अवघ्या चार तासांमध्ये 1 हजार 20 तिकिटांचे विक्रमी बुकिंग झाल्याचे दिसून आले. दैनंदिन एक्स्प्रेससोबत विशेष गाड्याही फुल्ल होत असल्यामुळे अजून काही गाड्यांची मागणी केली जात आहे. दसरोत्सवानंतर पुन्हा माघारी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-एसएमव्हीटी बेंगळूर दरम्यान रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी विशेष रेल्वेफेरीची घोषणा केली. रात्री 8 वाजता बेळगावमधून ही एक्स्प्रेस निघून सोमवारी सकाळी 8.30 वाजता बेंगळूर येथे पोहोचली.
त्याचबरोबर सोमवार दि. 6 रोजी रात्री 9 वाजता ही एक्स्प्रेस बेंगळूर येथून निघून मंगळवारी सकाळी 8.30 वाजता बेळगाव येथे पोहोचणार असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने सांगितले. या एक्स्प्रेसला एकूण 20 स्लिपर डबे असून 2 सेकंड क्लास कम लगेज ब्रेक व्हॅन तसेच दिव्यांगांसाठी एक डबा ठेवण्यात आला होता. लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळीसह इतर थांबे देण्यात आले होते. शनिवारी रात्री या एक्स्प्रेसची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह इतरांनी दिली. बाराशे आसन क्षमता असलेल्या या रेल्वेचे अवघ्या चारच तासांमध्ये 1 हजार 20 तिकीट बुकिंग झाले होते तर रविवारी सकाळपर्यंत एक्स्प्रेसचे तिकीट वेटींगवर होते. 1200 तिकीटेही बेळगाव-बेंगळूर दरम्यान कमी पडत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे बेळगावला अजून काही एक्स्प्रेस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.









