रॉकेटमधील चिपचे सॉफ्टवेअर चोरण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ कोची
इस्रोच्या सॉफ्टवेअरवर दरदिनी 100 हून अधिक सायबर हल्ले होत असतात अशी माहिती इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी केरळच्या कोची येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सायबर परिषदेदरम्यान दिली आहे.
रॉकेट तंत्रज्ञानासंबंधी सायबर हल्ले होण्याची शक्यता अत्यंत अधिक आहे, कारण यात अॅडव्हान्स सॉफ्टवेअर आणि चिपचा वापर केला जातो. हा धोका कितीही मोठा असो, इस्रो अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. आमची सिस्टीम सायबर सुरक्षा नेटवर्कने युक्त आहे. यात कुठल्याही प्रकारचे भगदाड पाडले जाऊ शकत नसल्याचे सोमनाथ यांनी म्हटले आहे.
सॉफ्टवेअरसोबत इस्रो रॉकेटमधील हार्डवेअर चिप्सच्या सुरक्षेवरही लक्ष केंद्रीत करत आहे. याकरता विविध प्रकारे परीक्षण केले जात आहे. पूर्वी आम्ही एका उपग्रहाच्या देखरेखीसाठी सॉफ्टवेअर तयार करत होतो. आता तेच काम अनेक उपग्रहांसाठी केले जात आहे. यातून कालौघात तंत्रज्ञान बदलत असल्याचे स्पष्ट होते. याचनुसार आम्हाला अपडेट व्हावे लागणार असल्याचे सोमनाथ म्हणाले.
सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात मदत करणारे उपग्रह सक्रीय आहेत. या सर्व उपग्रहांना विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जाते. या सर्वांच्या सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सोमनाथ यांनी नमूद पेले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स
अत्याधुनिक तंत्रज्ञान आमच्यासाठी एक वरदान आहे आणि धोका देखील. आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर करून सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. याकरता उत्तम संशोधन अन् कठोर मेहनत करावी लागणार असल्याचे उद्गार इस्रोप्रमुखांनी काढले आहेत.









