मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती : शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारांचे वितरण
बेळगाव : राज्यातील विविध प्रलंबित सिंचन प्रकल्पांना लवकरच चालना दिली जाणार आहे. विविध प्रकल्पाबरोबर आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. राज्य सरकार या सर्व प्रकल्पांना तात्काळ सुरुवात करणार आहे. केंद्र सरकारने या सिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी चालना द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. विधानसौध परिसरात रविवारी बेळगाव विभागीयस्तरीय कृषी अवजारांचा वितरण कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. सरकारने सिंचन प्रकल्पांना विशेषत: प्राधान्य दिले आहे. लघुसिंचन प्रकल्पावर 250 कोटींहून अधिक खर्च केला जात आहे. राज्यातील सर्वच सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी कृषीभाग्य योजना राबविण्यात आली आहे. यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बेळगाव विभागात ऊस उत्पादकांची संख्या अधिक आहे. यासाठी सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना 40 लाख रुपये तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना यंत्र सामुग्रीसाठी अनुदानांतर्गत 50 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
40 कोटी रुपयांच्या कृषी यंत्रांचे वाटप
यावेळी 40 कोटी रुपयांच्या एकूण 2150 विविध कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. यामध्ये 78 ऊस तोडणी यंत्रे, 100 पॉवरट्रीलर, 165 रोटोव्हेटर, 100 चारा कटींग मशीन, 64 बी-बियाणे ड्रील, 12 माती फवारणी यंत्रे, 120 नांगर, 1480 स्प्रिंक्लर यासह इतर यंत्र सामुग्रीचा समावेश आहे. कृषीमंत्री एन. चलुवराय्या स्वामी म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम राबविले आहेत. विशेषत: पहिल्यांदाच सामान्य वर्गातील शेतकऱ्यांसाठी तर अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांचे अनुदान अत्याधुनिक ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी देण्यात आले आहे.
याबरोबर बेळगाव विभागात उसाचे क्षेत्र अधिक असल्याने ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे. या यंत्रसामुग्रीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. 5 हमी योजनांच्या अंमलबजावणीमुळे सर्वसामान्यांना लाभ झाला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू सेठ, बाबासाहेब पाटील, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, कृषी विभागाचे आयुक्त व्ही. एस. पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









