माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेसमवेत अनेक देशांच्या तुलनेत अल्पसंख्याक समुदाय हा भारतात अधिक सुरक्षित आहे. धर्मनिरपेक्षता भारताच्या रक्तात असल्याचे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. वॉशिंग्टनमध्ये नॅशनल कौन्सिल ऑफ एशियन इंडियन असोसिएशनकडून आयोजित भारतीय-अमेरिकनांच्या एका सभेला त्यांनी संबोधित केले आहे.
भारताविरोधात दुष्प्रचार केला जात आहे. पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांमधील एक वर्ग यात सामील आहे. पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांचा एक वर्ग भारतविरोधात विशेषकरून अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवरून दुष्प्रचार करत आहे. भारतात अल्पसंख्याक हे अन्य कुठल्याही देशाच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचे सांगू इच्छितो. भारतात काय घडतेय आणि अन्य देशांमध्ये काय घडतेय हे सर्वांना माहित आहे, भारतासोबत भेदभाव होत असल्याचेही उघड असल्याचे नायडू यांनी म्हटले आहे.
ज्या लोकांना देश सोडून जायचा होता, ते पूर्वीच पाकिस्तानात गेले आहेत, भारतात राहू इच्छिणारे लोक भारतातच आहेत. भारतीय लोकांच्या डीएनएमध्येच धर्मनिरपेक्षता असल्याने भारतात धर्मनिरपेक्षता असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये. काश्मीर हा भारताचा अविभाज्य हिस्सा असल्याचे विधानही त्यांनी यावेळी पेले आहे. नायडू यांनी 41 व्या वार्षिक अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजीनमधील स्वत:च्या भाषात तंदुरुस्त जीवनासाठी जीवनशैलीतील बदलाच्या महत्त्वावर भर दिला. तसेच त्यांनी स्वत:च्या मातृभूमीबद्दलच्या कर्तव्याची आठवण उपस्थितांना करून दिली आहे.









