1 ऑगस्टपासून दरवाढ लागू : परिवहनच्या बसभाडे दरात वाढ
बेळगाव : राज्य परिवहन मंडळाने बस भाडेदरात वाढ केली आहे. 1 ऑगस्टपासून ही दरवाढ लागू होणार आहे. आता पर्यटन, विवाह, शैक्षणिक सहली आदींसाठी करार पद्धतीने परिवहनकडून बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या बसेसचा प्रवासदर प्रति कि.मी. 2 ते 5 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे भाड्याने बस घेणाऱ्या प्रवाशांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. वाढत्या इंधन दरवाढीने राज्य सरकारने ही वाढ केली आहे. ऑक्टोबरनंतर गोवा, हैद्राबाद, म्हैसूर, बेंगळूर, श्रवणबेळगोळ, हंपी, विजापूर आदी पर्यटनस्थळांसाठी बसेस भाड्याने घेतल्या जातात. परिवहनला यातून समाधानकारक महसूल प्राप्त होतो. मात्र, आता इंधन दरवाढीचे कारण पुढे करून बसभाडे दरात वाढ करण्यात आली आहे. किमान 350 किलोमीटर इतकी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्ल्यासाठीच बस उपलब्ध होणार आहेत. सामान्य बसेससाठी प्रति कि.मी. 47 रुपये आणि आंतरराज्य प्रवासासाठी प्रति कि.मी. 50 रुपये भाडे आहे. त्यामध्ये आता 2 ते 5 रुपयांची वाढ होणार आहे. परिणामी प्रतिकि.मी. भाडेदरात ही वाढ होणार आहे.
सुधारित दर आकारणी- के. के. लमाणी (डीटीओ, केएसआरटीसी)
इंधन दरवाढ झाल्याने राज्य सरकारने परिवहन मंडळाच्या बसभाडे दरात वाढ केली आहे. त्यामुळे भाड्याने बस घेणाऱ्या प्रवाशांना आता सुधारित भाड्यानुसार पैशांची आकारणी केली जाणार आहे. सर्व बसमध्ये हा नियम लागू आहे. साधारण 2 ते 5 रुपयांनी प्रतिकिलोमीटर वाढ होण्याची शक्यता आहे.









