13 तास चालली शोधमोहीम ः अमेरिकन अध्यक्षांच्या अडचणीत वाढ
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या डेलावेयर येथील घरी आणखी 6 गोपनीय फाइल्स आढळून आल्या आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या अधिकाऱयांनी सुमारे 13 तासांच्या तपासानंतर या फाइल्स ताब्यात घेतल्या आहेत. शोधमोहिमेवेळी बिडेन किंवा त्यांच्या पत्नी घरात नव्हत्या असे समजते.
यातील काही फाइल्स बिडेन हे सिनेटर असतानाच्या काळातील आहेत. तसेच उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत असतानाच्या फाइल्स देखील सापडल्या आहेत. खासगी मालकीच्या घरात गोपनीय फाइल्स मिळाल्याबद्दल कुठलाच खेद नसल्याचे बिडेन यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर रिपब्लिकन पार्टीने जोरदार टीका केली होती.
बिडेन यांच्या घरात सकाळी 9 वाजून 45 मिनिटांपासून रात्री 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत शोध घेण्यात आला. या शोधमोहिमेवेळी दोन्ही बाजूंचे प्रतिनिधित्व करणारे कायदेतज्ञ तसेच व्हाइट हाउसचा एक अधिकारी उपस्थित होता. शोधमोहिमेदरम्यान बिडेन यांच्या घरातील कानाकोपऱयाची तपासणी करण्यात आली आहे. शोधमोहिमेत गोपनीय फाइल्ससोबत काही हाताने लिहिण्यात आलेले कागद तसेच त्याच्या आसपास ठेवण्यात आलेली अन्य सामग्री ताब्यात घेण्यात आली आहे.
बिडेन यांनीच न्याय विभागाच्या अधिकाऱयांना घरात पुन्हा शोध घेण्यासाठी पाचारण केले होते. घरातील तपास पूर्ण होत नाही तोवर ही बाब जाहीर न करण्याचे आवाहन न्याय विभागाने केले होते असे वकील बॉब बॉयर यांच्याकडून सांगण्यात आले.
नोव्हेंबर महिन्यात बिडेन यांच्या खासगी घरातून 20 गोपनीय फाइल्स ताब्यात घेण्यात आल्या होत्या. या फाइल्स बिडेन यांच्या उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील होत्या. अमेरिकेत कार्यकाळ संपुष्टात आल्यावर अशाप्रकारचे गोपनीय दस्तऐवज स्वतःजवळ बाळगणे बेकायदेशीर मानले जाते.









