पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांची ग्वाही, पोलीस स्थानक उद्यापर्यंत कार्यान्वित
प्रतिनिधी /पेडणे
मोपा विमानतळ परिसरातील स्वतंत्र पोलीस स्थानकामध्ये येणाऱया प्रत्येक नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना योग्य तो न्याय देण्याची ग्वाही पेडणे तालुका पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली.
येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात 28 रोजी आयोजित मोपा विमानतळ पोलीस स्थानकाचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश केरकर, चांदेल पंचायतीचे सरपंच तुळशीदास गावस, कासारवर्णे सरपंच करिष्मा केणी, पंचायत प्रशासक पंचायतीच्या सरपंच आणि प्रशासकीय अधिकारी या सोबत संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
मोपा विमानतळ परिसरात स्वतंत्र पोलीस स्थानक स्थापन केले असून, पोलीस निरीक्षकपदी महेश केरकर यांची नियुक्ती केलेली आहे. या पोलीस स्थानकाच्या हद्दीत वारखंड, नागझर, उगवे, मोपा, तांबोसे, तोरसे, पत्रादेवी कासारवर्णे, हसापुर, चांदेल, इब्रामपूर, हणखणे आणि हळर्ण या गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या गावांपैकी बहुतेक गावातून मोपा विमानतळ परिसरात जाण्यासाठी किमान दोन किंवा तीन बस गाडय़ा बदलाव्या लागणार आहेत. त्यामुळे स्वतःचे वाहन नसल्यास ते परवडणार नाही, अशी नागरिकांची भावना झाली आहे.
दरम्यान गावा शेजारील गावातील लोकांना मोपा ऐवजी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जावे लागणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असता यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी संबंधित सर्व हद्दीतील गावांच्या प्रतिनिधींसोबत एक संयुक्त बैठक घेऊन सूचना समजावून घेतल्या. शिवाय चांदेल किंवा तळर्ण या ठिकाणी एक पोलीस चौकीही उभारण्याची योजना आहे, असे पोलीस उपाधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी सांगितले.
मोपा विमानतळावर स्वतंत्र पोलीस स्थानकाची स्थापना केल्यानंतर मोपा विमानतळाच्या मुख्य गेटवरून कुणालाच आत जाऊ दिले जात नाही. यावर बोलताना पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी, एखाद्या वेळी मोपा विमानतळ पोलीस स्थानकावर तक्रारदारला जायचे असल्यास त्याठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी त्या तक्रारदाराला थेट पोलीस स्थानकात घेऊन येतील. त्यामुळे कुणीही या विषयी गैरसमज किंवा घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
उद्यापर्यंत पोलीस स्थानक कार्यरत होणार
मोपा विमानतळावरील पोलीस स्थानक उद्या पर्यंत कार्यरत होणार आहे. नागरिकांनी त्या त्या परिसरातील आपापल्या ज्या काही समस्या, तक्रारीही असतील त्या तक्रारी द्याव्यात अशी सूचना शिरोडकर यांनी केली आहे.
सरकारने आणि स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी प्रयत्न करून या ठिकाणी मोपा पोलीस स्थानक उभारल्या बद्दल समाधान व्यक्त करून सरकार जनतेच्या हितासाठी वेगवेगळय़ा माध्यमातून कार्य करत आहे. या सरकारच्या मागे जनतेने खंबीरपणे उभे राहावे असेही आवाहन चांदेल सरपंच तुळशीदास गावस यांनी केले.
पेडणे पोलीस स्थानकावरील ताण कमी होणार
तालुक्मयासाठी एकमेव पेडणे पोलीस स्थानक होते, शिवाय हरमल येथे एक चौकी आहे. तरीही नागरिक पेडणे पोलीस स्थानकात तक्रारी देण्यासाठी येत होते. त्यामुळे दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत होता. अशा स्थितीतच आता मोपा विमानतळ परिसरात मोपा विमानतळावर पोलीस स्थानकाची स्वतंत्र स्थापना झाल्यामुळे पेडणे पोलीस स्थानकावरील ताण कमी होणार आहे, असे नागरिरकांचे म्हणणे आहे.
यावेळी पेडणे पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर आणि मोपा पोलीस स्थानकाचे निरीक्षक महेश केरकर यांचे नरेश कोरगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार प्रवीण आर्लेकर यांना धन्यवाद दिले.









