पणजी-जुनेगोवे मार्गावरीलही पूल मार्चपर्यंत होणार पूर्ण
पणजी : सुमारे 800 कोटी ऊपये खर्च करून धारगळ येथून मोप विमानतळापर्यंत बांधण्यात येणारा सहा पदरी लिंक रोड येत्या मार्चपर्यंत तयार होईल, अशी माहिती साबांखातील राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते आणि पूल यांच्याशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अशोका बिल्डकॉन या कंपनीतर्फे या पुलाचे बांधकाम करण्यात येत असून खरे तर तो गत ऑगस्ट महिन्यातच पूर्ण होणार होता. परंतु तांत्रिक अडचणींमुळे बांधकामाचा कालावधी सुमारे सहा महिने वाढवावा लागला. आता तो मार्च 2024 मध्ये पूर्ण होईल, असे सदर अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे करण्यात येत असून तो पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या विविध शहरांमधून मोप आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी लागणारी वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये मोप येथील मनोहर ग्रीनफिल्ड विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले होते. आता या विमानतळासाठी सहा पदरी एलेव्हेटेड लिंक रोड बांधण्यात येत असून तो जवळजवळ पूर्णत्वास आला आहे. मार्च 2024 पासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
पणजी-जुनेगोवे मार्गावरील पूलही मार्चपर्यंत पूर्णत्वास
दरम्यान, पणजीपासून जुने गोवे मार्गावर मेरशी भागात बांधण्यात येणाऱ्या पूलवजा जोडरस्त्याचेही बांधकाम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पुलाच्या मार्गात येणाऱ्या एका धार्मिक स्थळाचा प्रश्न निर्माण झाल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून सदर रस्त्याचे बांधकाम रखडले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या रस्त्यामुळे संपूर्ण रायबंदर भागाला बायपास रस्ता प्राप्त झाला आहे. त्यामुळे कदंब पठाराचेही भाग्य फळफळले असून ‘नवपणजी’ ठरावा असा या भागाचा विकास झाला आहे. हा रस्ता होण्यापूर्वी रायबंदर भागात वारंवार होणारी वाहतूक कोंडी इतिहासजमा झाली असल्याने तेथील नागरिकांनीही सुटकेचा निस्वास सोडला आहे. परंतु सदर बायपास पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास अवघ्या अंतराचा रस्ता अपूर्ण राहिल्यामुळे कित्येक वर्षांचा कालावधी लागला आहे. तो प्रश्नही आता सोडविण्यात आला असून तेथेही एलेव्हेटेड पद्धतीने रस्ता निर्माण करण्यात येत आहे. त्याचे बांधकाम प्रचंड गतीने सुरू असून एक भाग पूर्ण झाल्यानंतर त्यावरून वाहतूक सुरू करून नंतर दुसऱ्या भागाचे बांधकाम करण्यात येणार आहे. हा पूल चौपदरी असेल, अशी माहिती सदर अधिकाऱ्याने दिली.









