40 संघांचा होणार सहभाग : पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : राष्ट्रीय स्तरावरील मूट कोर्ट स्पर्धा 8 ते 10 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक लॉ सोसायटीच्या आर. एल. लॉ कॉलेज येथे 14 वी एम. के. नंबीयार मूट कोर्ट स्पर्धा होणार असून या स्पर्धेमध्ये देशातील 40 संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती केएलएसचे सेक्रेटरी अॅड. विवेक कुलकर्णी, अॅड. एस. व्ही. गणाचारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटक लॉ सोसायटीच्या बेळगाव येथील आर. एल. लॉ कॉलेजला 80 वर्षे पूर्ण झाली. या कॉलेजमधून अनेकांनी कायद्याची पदवी घेऊन त्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपले नाव उमटविले आहे. अनेक न्यायाधीश तसेच नामांकित वकिलांनी या कॉलेजमधूनच शिक्षण घेतले आहे. ते सध्या देशभरात सेवा बजावत आहेत. आर. एल. लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. याचबरोबर स्पर्धात्मक परीक्षांवर भर दिला जातो.
राष्ट्रीय स्तरावरील मूट कोर्ट स्पर्धा 8 ते 10 मार्च पर्यंत होणार आहे. या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल बी. कट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कर्नाटक लॉ सोसायटीचे सेक्रेटरी अॅड. व्ही. जी. कुलकर्णी याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या स्पर्धेतील विजेत्या संघांना तसेच स्पर्धकांना 10 मार्च रोजी बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ई. एस. इंद्रेश, ज्येष्ठ वकील आणि कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष अनंत मंडगी, सोसायटीचे चेअरमन अॅड. पी. एस. सावकार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पद्मविभूषण माजी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्यातर्फे मूट कोर्ट स्पर्धेमधील विजेत्या संघाला व इतर स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. या स्पर्धा घेण्यासाठी ज्येष्ठ वकिलांसह काही न्यायाधीशही उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. आश्विनी परब यांनी स्वागत केले. या पत्रकार परिषदेवेळी आरएलएलसी सदस्य अॅड. आर. एस. मुतालिक, सदस्य अॅड. व्ही. एम. देशपांडे, प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार हे उपस्थित होते.









