पृथ्वीवरचे इलेक्ट्रॉन्स आणि चंद्रावरील पाणी यांच्या संबंधांवर चांद्रयानाचा प्रकाश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ज्या चंद्राच्या दर्शनाने पृथ्वीवरील समुद्रांना उधाण येते, तोच चंद्र त्याच्या स्वत:वर पाणी निर्माण करण्यासाठी पृथ्वीचे साहाय्य घेतो, असे आता उघड होत आहे. भारताच्या चांद्रयान-3 या अभियानाच्या अंतर्गत चंद्रावर अवतीर्ण झालेल्या ‘प्रज्ञान’ या वाहनाने पाठविलेल्या माहितीच्या विश्लेषणातून पृथ्वी आणि चंद्र यांचे नाते स्पष्ट होत आहे. त्यातून ही माहिती मिळालेली आहे.
प्रज्ञान या चांद्रबग्गीने (रोव्हर) चंद्राची बरीच नवी माहिती पाठविली आहे. संशोधक या माहितीचे विश्लेषण करीत आहेत. पृथ्वीवरच्या इलेक्ट्रॉन्समुळे चंद्रावर पाण्याची निर्मिती होते, हा शोध याच माहितीच्या आधारे लावण्यात आला आहे. प्रज्ञानमधून मिळालेली माहिती केवळ भारतीय संशोधकांनाच नव्हे, तर अमेरिका आणि इतर देशांमधील संशोधकांनाही उपयुक्त होत आहे. चंद्रावरील पाणी आणि त्याचा पृथ्वीशी संबंध यांवर अमेरिकेच्या हवाई विद्यापीठात संशोधन केले जात आहे. प्रज्ञानच्या माहितीच्या आधारावर हे महत्त्वाचे संशोधन होत आहे.
वातावरणीय इलेक्ट्रॉन्सचे साहाय्य
पृथ्वीच्या तरल वातावरणात (प्लाझमा) जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते चंद्रावरील खडक आणि खनिजे यांचे विघटन करतात. या विघटनाच्या प्रक्रियेतून तेथे पाण्याची निर्मिती होते. ही जलनिर्मिती प्रक्रिया कोट्यावधी वर्षांपासून होत आहे. पृथ्वीच्या वातावरणातील इलेक्ट्रॉन्सची यात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका आहे
नियतकालिकात प्रसिद्धी
या महत्त्वपूर्ण संशोधनाला ‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्धी देण्यात आली आहे. चंद्रावरील पाण्याचे साठे आणि या साठ्यांची स्थाने यांचा आणखी सखोल अभ्यास आवश्यक असून आतापर्यंतच्या संशोधनातून चंद्रावर पाण्याची निर्मिती कशी झालेली आहे आणि होत आहे, याचे अनुमान काढण्यात आले आहे. चंद्राच्या पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या भागात पाणी कसे निर्माण होते, हे सर्वंकषरित्या समजून आल्यास एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे, असा संशोधकांना विश्वास वाटतो. त्यामुळे हे संशोधन होत आहे.
तिन्ही अभियानांचा हातभार
भारताने 2008, 2019 आणि 2023 या तीन वर्षांमध्ये तीन चांद्रयाने हाती घेतली. या तिन्ही अभियानांमुळे चंद्राची रहस्ये शोधण्यासाठी हातभार लागला आहे. सौरवादळांमुळे पृथ्वीच्या वातावरणीय इलेक्ट्रॉन्सचा मारा चंद्रावर सातत्याने होतो. यामुळे तेथील खनिजे आणि खडक यांच्यावर योग्य ती प्रक्रिया होऊन जलनिर्मिती होते, हे आता निश्चित मानण्यात येत आहे. या प्रक्रियेची अधिक माहिती मिळविण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता आहे, असे संशोधक मानतात.
प्रक्रिया कशी होते ?
चंद्रावर जलनिर्मिती प्रक्रिया कशी होते, याचीही माहिती संशोधकांनी दिली आहे. पृथ्वीभोवती भ्रमण करताना चंद्र जेव्हा ‘चुंबकीय पुच्छक्षेत्रा’च्या (मॅग्नेटोटेल) बाहेर येतो, तेव्हा सौरवादळातून निर्माण झालेल्या सौरवायूच्या झोतांचा मारा चंद्रावर होतो. यातून हे इलेक्ट्रॉन्स चंद्रावर पोहचतात. त्यातून जलनिर्मिती होते. पृथ्वीच्या चुंबकीय पुच्छक्षेत्रात ज्या प्रकारे जलनिर्मिती झाली, तशाच प्रकारे चंद्रावरही जलनिर्मिती झालेली आहे. ही प्रक्रिया सातत्याने घडत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
पृथ्वीचे चंद्राशी घट्ट नाते
चंद्र पृथ्वीपासून किमान सरासरी 8 लाख किलोमीटर दूर असला, तरी त्यांचे एकमेकांशी अत्यंत जवळीकीचे नाते आहे. अद्याप या नात्याचे सर्व बंध मानवाच्या ज्ञानकक्षेत आलेले नाहीत. मात्र, चंद्रावरील जलनिर्मिती आणि तिचा पृथ्वीशी असणारा संबंध यातून हे नाते आता हळूहळू स्पष्ट होत आहे. पृथ्वी आणि चंद्र यांचे एकमेकांवर अन्य कोणत्या प्रकारे परिणाम होतात, हे संशोधनातून स्पष्ट होत जाईल. भारताच्या चांद्रयान-3 अभियानाने हे नाते अधिक स्पष्ट करण्यात मोलाची भर घातली जात आहे, यातून या अभियानाचे महत्त्व स्पष्ट होत आहे.
पृथ्वी आणि चंद्र
ड पृथ्वी आणि चंद्र हे एकाच अवकाश व्यवस्थेचे दोन संलग्न घटक
ड चंद्रावरील जलनिर्मितीत पृथ्वीवरच्या इलेक्ट्रॉन्सची भूमिका महत्त्वाची
ड सौरवायुझोतांच्या माध्यमातून हे इलेक्ट्रॉन्स पोहचतात चंद्रापृष्ठभागी
ड पृथ्वी आणि चंद्र यांचे नाते चांद्रयान-3 अभियानातून अधिक स्पष्ट









