वृद्धीदर 5.5 टक्क्यांवर राहणार असल्याचे दिले संकेत
नवी दिल्ली :
भारताचा आर्थिक वाढीचा 2023 साठीचा अंदाज हा 4.8 टक्क्याऐवजी आता तो 5.5 टक्के इतका राहणार असल्याचे भाकीत मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस (मूडीज)ने व्यक्त केले आहे. अर्थसंकल्पातील भांडवली खर्चात झालेली झपाट्याने वाढ आणि चांगली आर्थिक स्थिती पाहता ही वाढ करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
मूडीजने मात्र 2022 साठी भारताचा वाढीचा अंदाज सात टक्क्यांवरून 6.8 टक्के केला आहे. ग्लोबल ब्रॉड आउटलुक 2023-24 च्या फेब्रुवारी अपडेटमध्ये मूडीजने यूएस, कॅनडा, युरोप, भारत, रशिया, मेक्सिको आणि तुर्कीसह अनेक जी 20 अर्थव्यवस्थांसाठी वाढीचा अंदाज वाढवला आहे. ही वाढ 2022 च्या मजबूत समाप्तीमुळे करण्यात आल्याचेही मूडीजे रेटिंगने स्पष्ट केले आहे.
भांडवली खर्चाची तरतूद
भारताच्या बाबतीत, आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी (जीडीपीच्या 3.3 टक्के) तरतूद झपाट्याने वाढविण्यात आली आहे. हा आकडा मागील आर्थिक वर्षात 7,500 अब्ज रुपयांवरून 10,000 अब्ज रुपयांवर पोहोचला असल्याचेही मूडीजने म्हटले आहे.









