जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पाणी सोडण्याचे आदेश;अधिकाऱ्यांकडून पाहणी
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील येळवी ग्रामसभेतील ठरावाची दखल शासन व प्रशासनाने तातडीने घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी येळवी तलावात तातडीने पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, म्हैसाळचे उपविभागीय अभियंता संतोष भोसले, शाखा अभियंता महेश पाटील, सुहास पवार यांनी येळवी येथे भेट देवून तलावात पाणी कसे सोडता येईल याची पाहणी तर केलीच त्याचबरोबर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. येळवी तलावात लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन केले जाईल अशी माहिती म्हैसाळचे उपविभागीय अभियंता संतोष भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जत तालुक्यातील तलावात म्हैसाळचे पाणी सोडावे यासाठी येळवीचे माजी उपसरपंच सुनील अंकलगी यांनी म्हैसाळ अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. येळवीच्या ग्रामसभेतही टंचाईतून पाणी सोडावे असा ठराव घेण्यात आला होता. येळवी तलावाने तळ गाठला तरी पाणी सोडले जात नसल्याबद्दल ग्रामस्थांनी सभेत नाराजी व्यक्त करत निषेधही नोंदविला होता.
गुरुवारी म्हैसाळचे उपविभागीय अभियंता संतोष भोसले. शाखा अभियंता महेश पाटील, सुहास पवार यांनी येळवीला भेट दिली. यावेळी येळवीचे माजी उपसरपंच सुनील अंकलगी, रघुनाथ जमदाडे,ज्येष्ठ नागरिक दऱ्याप्पा जमदाडे, संचालक धोंडीराम कुलाळ, पप्पू व्हनमाने, कोंडीबा माने, सैनाप्पा माने, पांडुरंग डोंबाळे, खैरावचे नवनाथ चौगुले, दऱ्याप्पा क्षीरसागर, टोणेवाडीचे विष्णू नुलके आदि उपस्थित होते.
येळवी तलावात सांगोला वितरण नलिकेतून
टंचाई मधून पाणी सोडण्यात आले होते. परंतु विसर्ग कमी असल्याने पुरेसा पाणी साठा तलावात झाला नाही. येळवीतील पाणी टंचाई लक्षात घेवून येळवी तलावात म्हैसाळच्या मुख्य कालव्यामधून नराळे ओढ्या मार्गे पाणी सोडण्याची मागणी येळवीचे माजी उपसरपंच सुनील अंकलगी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली. अधिकाऱ्यांनी जागेवर जावून पाहणी केली. म्हैसाळच्या मुख्य कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन आखू व येळवी तलावात लवकरात लवकर पाणी सोडू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. तसेच बंदिस्त पाईपलाइनद्वारेही शेतकऱ्यांना पाणी द्यावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.








