अरविंद केजरीवालांची घोषणा : वेतन थकल्याप्रकरणी इमामांचे आंदोलन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत नव्या योजनेची घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुजारी आणि ग्रंथी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत मंदिरांमध्ये पूजा करणारे पुजारी आणि गुरुद्वारांच्या ग्रंथींना दर महिन्याला सन्मान निधी देण्याची तरतूद असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे 17 महिन्यांपासून दिल्लीत इमामांना वेतन मिळाले नसल्याने ते आंदोलन करत आहेत.
नव्या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला मंदिरांचे पुजारी तसेच गुरुद्वाराच्या ग्रंथींना 18 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी मंगळवारपासून नोंदणी सुरू होणार आहे. कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जात नेंदणीचा प्रारंभ केला जाणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. पुजारी आणि ग्रंथी हे समाजाची सेवा करतात. आम आदमी पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास आम्ही पुजारी आणि ग्रंथींना दर महिन्याला 18 हजार रुपये देऊ. पुजारी आणि ग्रंथींच्या नोंदणीत भाजपने अडथळे आणू नयेत. भाजपने ही योजना रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला पाप लागेल असे वक्तव्य केजरीवालांनी केले आहे.
भाजपकडून टीका
अनेक वर्षांपासून मंदिरांचे पुजारी आणि सर्व गुरुद्वारांच्या ग्रंथींना वेतन आम्ही दिले आहे. परंतु मागील 10 वर्षांपासून केजरीवाल हे दिल्लीतील सर्व मशिदींच्या मौलवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेतन देत आहेत. आता निवडणूक येताच केजरीवालांना पुजारी आणि ग्रंथी आठवू लागले आहेत असा आरोप भाजप नेते परवेश वर्मा यांनी केला आहे.
हरदीप पुरींना व्हावी अटक
रोहिंग्या घुसखोरांप्रकरणी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना अटक करण्याची मागणी मी करतो. हरदीप सिंह यांच्याकडे रोहिंग्यांना कुठे आणि कसे वसविले याचा पूर्ण डाटा आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.









