वृत्तसंस्था/ दुबई
बांगलादेशचा अष्टपैलू मेहिदी हसन मिराझची एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून आयसीसीने निवड केली तर महिलांमध्ये हा बहुमान स्कॉटलंडच्या कॅथरिन ब्राईसला मिळाला.
मिराझने ब्लेसिंग मुझारबनी व बेन सीयर्स यांना मागे टाकत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला. आयसीसीचा हा पुरस्कार पटकावणारा तो बांगलादेशचा तिसरा खेळाडू आहे. याआधी मुश्फिकुर रहीम व शकीब अल हसनने हा पुरस्कार पटकावला होता. हा पुरस्कार मिळविण्याची मिराझची ही पहिलीच वेळ आहे. ‘आयसीसीचा हा पुरस्कार मिळविणे खूप मानाचे असते. जगभरातून यासाठी मतदान केले जाते, त्यामुळे हा पुरस्कार खास आनंद देणारा आहे. माझ्या क्रिकेटमधील प्रवासाचा आठवण करून देणारा हा पुरस्कार आहे. 2016 मध्ये यू-19 वर्ल्ड कपमध्ये मला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिळालेल्या त्या पुरस्कार खूप प्रोत्साहन मिळाले होते, अशा भावना मिराझने व्यक्त केल्या. एप्रिलमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने चमकदार प्रदर्शन केले होते.









