वृत्तसंस्था/ माँटेकार्लो (मोनॅको)
एटीपी टूरवरील माँटेकार्लो मास्टर्स-1000 दर्जाच्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेला येथे रविवारपासून प्रारंभ होत आहे. एटीपी टूरवरील ही महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. क्ले कोर्टवर खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जगातील अव्वल पुरुष टेनिसपटू सहभागी होत आहेत. सर्बियाचा जोकोव्हिच, रशियाचा मेदव्हेदेव, जपानचा नेकाशिमा, मॅकेन्झी मॅकडोनाल्ड, तसेच अन्य सीडेड टेनिसपटू जेतेपदासाठी प्रयत्न करतील.
या स्पर्धेमध्ये सर्बियाचा टॉप सीडेड जोकोव्हिचला कदाचित उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इटलीच्या जेनिक सिनेरशी लढत द्यावी लागेल, असा अंदाज आहे. रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव आणि सिनेर यांच्या कामगिरीवर टेनिसशौकिनांचे लक्ष लागले आहे. एटीपीच्या मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थान पटकाविलेला सर्बियाचा जोकोव्हिच या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत आपले अग्रस्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करेल. रविवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत जोकोव्हिचचा सलामीचा सामना नेकाशिमा किंवा मॅकडोनाल्ड यांच्याशी होणार आहे. इटलीच्या सिनेरचे येथे आगमन झाले असून त्याचा सलामीचा सामना गोफीन किंवा शुआर्त्झमन बरोबर होईल. सिनेरने 2023 च्या टेनिस हंगामात दुसऱ्यांदा एटीपी मास्टर्स स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. यापूर्वी त्याने मियामी येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये पहिली मास्टर्स-1000 दर्जाची टेनिस स्पर्धा जिंकणारा रुमानियाचा रुने हा अव्वल स्पर्धकांना धोकादायक ठरू शकेल. रुने आणि मेदव्हेदेव यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल, अशी अपेक्षा आहे. ब्रिटनचा अँडी मरे आणि ऑस्ट्रेलियाचा अलेक्स डी मिनॉर यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.









