मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : घरांमध्येही घुसले पाणी, जनजीवन विस्कळीत
वृत्तसंस्था/ कोची
केरळमधील वायनाड, त्रिशूर, कोझिकोड, पलक्कड आणि कन्नूर जिह्यांमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या आणि जलाशयांची पाण्याची पातळी धोकादायक स्थितीत आहे. काही भागात पूरस्थितीमुळे शेकडो लोक आपले घर सोडून सुरक्षित ठिकाणी आणि मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. प्रशासकीय पथके मदत आणि बचावकार्यात गुंतली आहेत.
तीन दिवसांपूर्वी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यापासून धुवाँधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने त्रिशूरमधील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. झाडे पडल्याने रेल्वे ट्रॅकवरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वायनाडच्या सुलतान बाथेरी भागातील पुझमकुनी गावातील अनेक आदिवासी कुटुंबांना वाचवण्यात आले आहे. सध्या त्यांना मदत छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. एनडीआरएफ पथके सक्रिय झाली असून स्थानिक प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
पलक्कड जिह्यातील उंचावरील अट्टाप्पाडी आणि नेल्लियमपथी येथेही मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कोझिकोडमधील पुनूर पुझा नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीच्या वर पोहोचली आहे. प्रशासनाने स्थानिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सर्व पर्जन्यप्रभावित भागात मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत.
आपत्ती व्यवस्थापनकडून अलर्ट जारी
केरळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) राज्यातील अनेक जिह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो रंगाचे अलर्ट जारी केले आहेत. अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये इडुक्की, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड आणि कन्नूर यांचा समावेश आहे. येथे जोरदार वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय कोल्लम, अलाप्पुझा आणि कासारगोडमध्ये पाऊस आणि भूस्खलनाचा धोका आहे. मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी लोकांना अधिक सतर्क राहण्याचे, आपत्ती नियंत्रण केंद्रांशी संपर्क साधण्याचे आणि सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.









