पुणे : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून यंदा पाच दिवस आधीच अंदमानात दाखल होण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले असानी चक्रीवादळ यासाठी काही अंशी निमित्त ठरले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशभरात पुढील चार आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पहिल्या आठवडय़ात अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसतील. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ात अरबी समुद्रावर, त्यापुढील आठवडय़ात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. त्यामुळे मान्सून या आठवडय़ातच म्हणजे जवळपास 15 मेपर्यंत अंदमानात येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरवर्षी मान्सून 20 मेच्या आसपास अंदमान निकोबार बेटांवर दाखल होतो. मात्र, यंदा तो लवकर दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे. युरोपीयन हवामान संस्थेने यंदा मान्सून दहा दिवस आधीच केरळात दाखल होण्याचे संकेत दिले आहे. या पार्श्वभूमीवर मान्सून अंदमानात वेळेआधीच आला तर त्याचे केरळातील आगमनही लवकर होईल.