ताजी हवा,पक्षी, फुलपाखरांच्या सहवासात पर्यटक धबधब्यावर : आमदार गणेश गावकरतर्फे बावटा दाखवून मान्सून ट्रेकिंगला प्रारंभ
धारबांदोडा : धारबांदोडा तालुक्यातील तांबडी सुर्ला येथील धबधब्यावर गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे आयोजित केलेल्या मान्सून ट्रेकिंग मोहीमेची सुरूवात पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार गणेश गावकर यांनी बावटा दाखवून केली. वर्षा पर्यटनासाठी हा धबधबा प्रसिद्ध असून भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट जंगलात हा धबधबा वसलेला आहे. धारबांदोडा तालुक्यात पर्यटणासाठी येणारे पर्यटक व अतिथी हे आमच्यासाठी देवासमान असून गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही ही मोहीम राबविली जात आहे. सर्वानी काळजीपुर्वक व साहसाने या मोहीमेचा आनंद घ्यावा. येथील ट्रेकिंग मोहीमेसाठी पर्यटन विकास महामंडळातर्फे खास योजना आखण्यात आली आहे असे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यावेळी म्हणाले. हा धबधबा तांबडी सुर्ला येथील पुरातन महादेव मंदिरापासून सुमारे 90 मिटर अंतरावर आहे. सुमारे पन्नास मिटर वरून हा धबधबा खाली कोसळत आहे. तेथे जाण्यासाठी अंदाजे एक तासाचा अवधी लागत आहे. या धबधब्यावर टेकिंग मोहीमेत सहभागी होऊ पाहणाऱ्यासाठी पणजी व मडगांवहून पर्यटन महामंडळातर्फे खास बसगाड्यांची सोय केली जात आहे. टेकिंग करत असताना काही नाले टेकड्या वरून वाहतानाचे विहंगम दृष्टीस पडते. ताजी हवा, पाणी, रंगबिरंगी पक्षी आणि फुलपाखरे पाहायला मिळतात. वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हा धबधबा अतिशय सुरक्षित आहे.









