जागतिक तापमानवाढीमुळे मान्सून लहरी होत असल्याचा अभ्यास संशोधनातून पुढे आला आहे. मागच्या काही वर्षांत मोसमी पाऊन उशिरा सुरू होऊन लांबत असल्याची उदाहरणे आहेत. किंबहुना, यंदाच्या वर्षी मात्र नियोजित वेळेआधीच मान्सूनचा प्रवास सुरू झाला असून, ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मे महिन्यातच मान्सून केरळ, किनारपट्टीवर थडकल्याचे दिसत आहे. याशिवाय या वर्षी मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यामध्ये महाराष्ट्रासह इतर भागांत जोरदार तडाखा दिल्याचे पहायला मिळते. मागच्या काही दिवसांत बेंगळूर, दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. जागतिक तापमानवाढीचा हा एक परिणाम असल्याचे बोलले जाते. यंदा मान्सूनचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 105 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनचा सुफरफास्ट प्रवास बघता हे वर्ष पाणीदार राहण्याची चिन्हे आहेत.
नैत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनला भारतासारख्या देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मोसमी पावसावर देशातील शेतीमातीचे भरण-पोषण होतेच. शिवाय अगदी जलव्यवस्थापनापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक घटकावर मान्सून परिणाम करतो. त्यामुळे मान्सूनचा अंदाज काय राहणार आणि प्रत्यक्षात त्याचा प्रवास कसा असणार याकडे देशवासियांचे लक्ष असते. यावषी जून ते सप्टेंबरदरम्यान बरसणाऱ्या मान्सूनच्या हंगामात भरभरून पावसाचे दान पडणार आहे. सरासरीच्या 105 टक्के पाऊस यावषी पडण्याची शक्मयता असून जम्मू काश्मीर, पूर्वोत्तर भारत तसेच तामिळनाडू, पाँडिचेरीचा भाग वगळता महाराष्ट्रासह इतर राज्यात अधिकच्या पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबतचा पहिला दीर्घकालीन अंदाज वर्तविला आहे. यामध्ये 5 टक्के कमी-अधिकतेची शक्मयता गृहीत धरण्यात आली आहे. प्रशांत महासागरातील ला निनो संपला असून, आगामी काळात एल निनो उद्भवणार नाही. सध्या भारतीय महासागरात आयओडीची स्थिती स्थिर असून, मान्सूनच्या हंगामातदेखील ही स्थिती कायम राहील. या दोन्ही स्थिती मान्सूनसाठी पोषक आहेत. मान्सूनच्या हंगामात सरासरी 87 सेंमी इतका पाऊस देशभर होत असतो. यंदाच्या वर्षाची अनुकूल स्थिती पाहता मान्सूनच सरासरीहून अधिक पडण्याचा अंदाज आहे.
सर्वदूर दमदार पाऊस
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील, तर जम्मू काश्मीर, पूर्वोत्तर राज्य, तामिळनाडू, पाँडिचेरीमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची चिन्हे आहेत.
कृषी प्रवण क्षेत्रात पाऊस चांगला
मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र आदी राज्यात यंदा दमदार पाऊस अपेक्षित आहे. त्याचा पीक-पाण्याला फायदा होऊ शकतो. पीकपाणी चांगले राहिले, तर अर्थव्यवस्था मजबूत राहते. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळण्याची आशा आहे.
मे महिन्यात अवकाळीचा धुमाकूळ
यंदाचा मे महिना सर्वार्थाने वेगळा ठरला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे मान्सून लहरी होत असून त्याचा कालावधी उशिरा सुरू होऊन लांबत असल्याचा अभ्यास पुढे आला आहे. हे जाणवत असतानाच यंदा मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यात धुमाकूळ घातला आहे. तुरळक दिवस वगळता महाराष्ट्र तसेच देशात सरासरीच्या अधिक पाऊस होत आहे. मुसळधार पावसाबरोबरच गारपिटीने पुणे, बेंगळूर, दिल्ली, मुंबई यांच्यासह अनेक शहरांना झोडपून काढले आहे. जागतिक तापमानवाढीचा हा एक परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
मे महिन्यामध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस
फेब्रुवारी ते मे हा उन्हाळी हंगाम मानला जातो. मागच्या काही वर्षांत मे महिनाही रखरखलेला असल्याचेच पहायला मिळते. या महिन्यात वळवाचा पाऊस पडणे अपेक्षित असते. पण, अलिकडे त्याचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा मात्र वळवाने चांगलाच दणका दिला. त्याला जोडून मान्सूनपूर्व पावसानेही वातावरण पावसाळी बनवले. हा सगळा माहौल तयार होत असताना मान्सून एक्स्प्रेसही सुसाट सुटल्याचे चित्र बघायला मिळते. यंदा मे महिन्याचा विचार केला तर पावसाची सरासरी ओलांडत महाराष्ट्रात अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यात 22 मेपर्यंत सरासरीच्या 768 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व जिल्हे पाणीदार झाले आहेत. मागचे सगळे रेकॉर्ड पावसाने मोडले आहेत.
महाराष्ट्रात साधारणपणे 1 मे ते 22 मे दरम्यान 7.5 मिमी इतका पाऊस होतो. यंदा मात्र 62.9 मिमी पाऊस होत सरासरीच्या 768 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. जिल्हानिहाय स्थिती पाहता, राज्यातील सर्वच जिह्यांनी सरासरी ओलांडली असून, अतिरिक्त पाऊस झाला आहे. यात पालघर 2050 टक्के, मुंबई 1865, मुंबई उपनगर 1330, ठाणे 2100, पुणे 1375, सातारा 435, कोल्हापूर 145, सिंधुदुर्ग 1701, रत्नागिरी 1060, रायगड 2300, सांगली 217, नाशिक 893, नगर 499, सोलापूर 334, नंदुरबार 1382, धुळे 1982, जळगाव 229, नागपूर 840 टक्के पाऊस झाला आहे.
गोवा, कर्नाटकातही पाऊसपाणी जोरदार
गोवा आणि कर्नाटक राज्यातदेखील मे महिन्यात जोरदार पाऊस झाला असून, महिन्याची सरासरी ओलांडत अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटकात अतिवृष्टी झाली असून सरासरीच्या 167 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. तर गोव्यात 991 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. देशाची स्थितीदेखील फारशी वेगळी नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले द्रोणीय क्षेत्र, हिमालयात लागोपाठ धडकलेले पश्चिमी विक्षोभ आदी कारणांमुळे यंदा देशभर पाऊस होत आहे. पूर्वोत्तर भागातील तुरळक राज्ये वगळता देशभर पावसाने सरासरी ओलांडली आहे आणि गेल्या कित्येक वर्षातील रेकॉर्ड तोडला आहे.
पावसाची कारणे
हिमालयात पाठोपाठ धडकलेले पश्चिमी विक्षोभ, विविध ठिकाणची द्रोणीय स्थिती बंगालच्या उपसागराकडून येत असलेले आर्द्रतायुक्त वारे, अरबी समुद्रातील द्रोणीय स्थिती-कमी दाबाचे क्षेत्र यामुळे पावसाचा मारा अधिक होत आहे. यामुळे देशासह राज्यात पाऊस होत आहे
का येणार मान्सून लवकर?
अरबी समुद्रात गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढणार आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे मान्सूनची अरबी समुद्रावरील शाखा मजबूत झाली असून, मोसमी वारे पुढे सरकण्यातही मदत होत आहे. याशिवाय बंगालच्या उपसागर 27 मे च्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या क्षेत्रामुळे मोसमी वाऱ्यांची पूर्व शाखा मजबूत होणार असून, मान्सूनला आणखी गती मिळणार आहे. वास्तविक केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा प्रवास अधिक गतीने झाल्याचे दिसत आहे. शनिवारी मोसमी वाऱ्यांनी केरळबरोबरच तामिळनाडूचा बहुतांश भाग, तसेच कर्नाटकच्या काही भागापर्यंत मजल मारल्याचे जाहीर करण्यात आले. मान्सून आता गोव्याच्या उंबरठ्यावर असून, पुढच्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातही मोसमी वारे प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. देशवासियांकरिता हे शुभवर्तमानच म्हटले पाहिजे.
मे महिन्यातच पुणे-मुंबई गाठणार
महाराष्ट्रात मान्सून 7 मेच्या आसपास येतो, तर 10 मेपर्यंत तो पुण्यामुंबईपर्यंत धडक मारतो. पण मान्सून या वर्षी सुफरफास्ट वेगात आहे. 9 दिवस आधीच म्हणजेच 13 मे रोजीच तो अंदमानात दाखल झाला. त्यानंतर हाच वेग कायम ठेवत त्याने केरळ, कर्नाटक पादाक्रांत केले. आता महाराष्ट्रातही त्याच्या आगमनाचे मळभ दाटले आहे. हे बघता चालू महिन्यातच त्याचे आगमन होणार, हे निश्चित आहे. 15 जुलैपर्यंत सर्वसाधारणपणे मोसमी पाऊस देश व्यापतो. या वर्षीचा त्याचा ट्रेंड पाहता 10 ते 15 दिवस आधीच देशभर मोसमी वारे सक्रिय होण्याची चिन्हे दिसतात.
मोसमी पाऊस हे भारतासारख्या देशाला मिळालेले वरदान होय. पण, हाच पाऊस अगदी लहरी होतो, तेव्हा त्याचे प्रतिकूल परिणामही देशाला व देशवासियांना भोगावे लागतात. यंदा सुऊवातीच्या टप्प्यात मान्सूनची एन्ट्री चांगली झाला खरी. परंतु, त्यामुळेही शेतीच्या कामांमध्ये काही समस्या निर्माण झालेल्या पहायला मिळतात. आता पुढच्या टप्प्यात मान्सूनचा प्रवास कसा असेल, पाऊस सक्रिय झाल्यानंतर मोठे खंड तर पडणार नाहीत ना किंवा काही भागांना अतिवृष्टी वा ढगफुटीसदृश पावसाचा तर फटका बहणार नाही ना, ही धाकधूक कायम असेल. असे असले, तरी पावसाच्या दृष्टीने असलेले सकारात्मक वातावरण बघता हे वर्ष आबादानी ठरेल, असा विश्वास वाटतो.
– अर्चना माने-भारती, पुणे









