एकूण 18 दिवस चालणार अधिवेशन
प्रतिनिधी / पणजी
गोवा राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवार दि. 15 जुलैपासून सुरू होत असून विविध विषय आणि प्रश्नांवऊन विरोधी आमदार आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधी आमदारांनी सरकारला विविध प्रश्नांवऊन धारेवर धरण्याचे ठरवल्याने मुख्यमंत्र्यांसह सरकारची कसोटी लागणार आहे.
विधानसभा सचिवालयाकडे या अधिवेशनासाठी सुमारे 2909 प्रश्न आले असून त्यात 786 तारांकीत व 2123 अतारांकीत प्रश्नांचा समावेश आहे. अधिवेशनात सरकारतर्फे विविध विधेयके मांडली जाणार असून मागील अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर केलेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. विविध खात्यांच्या पुरवणी मागण्यांवरही चर्चा केली जाणार आहे.
ज्वलंत विषय चर्चेला येणार
आसगांव येथील आगरवाडेकर घर मोडतोड प्रकरण, कायदा ा सुव्यवस्था, दरडी कोसळणे, रस्त्यांची दुर्दशा, पाणी तुंबणे, म्हादई प्रकरण, कला अकादमी, तमनार प्रकल्प, स्मार्ट सिटी कामे, राष्ट्रीय महामार्गाचे निष्कृष्ट काम असे विविध प्रकारचे ज्वलंत विषय चर्चेला येणार असून त्यावर सत्ताधारी ा विरोधक यांच्यात जुंपणार असल्याची लक्षणे दिसत आहेत. हे अधिवेशन सुमारे 18 दिवस चालणार असून आहे. रोमन लिपीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा, 16 जानेवारी जनमत कौल दिन पाळावा अशा मागण्या करणारे ठराव येणार आहेत. त्याशिवाय लक्षवेधी सूचना, शून्य तास, खासगी ठराव यांचाही समावेश कामकाजात आहे.
सरकारी विधेयके अद्याप निश्चित नाही
या अधिवेशनात तीन दिवस अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे तर 15 दिवस विविध मागण्यांवर चर्चा होणार असून त्यानंतर त्यांना संमती दिली जाणार आहे. शुक्रवार हा खासगी ठरावाचा दिवस असून प्रति शुक्रवार 5 ठराव चर्चेला येणार आहेत. एकूण 15 ठराव चर्चेला घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकारी विधेयके अधिवेशन सुरू होण्याचा दिवस उजाडला तरी निश्चित झालेली नसल्याचे सांगण्यात आले.
राहुल गांधी यांची लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली म्हणून त्यांचे अभिनंदन करणारा ठराव विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी सादर केला आहे. तो चर्चेला घेणार की नाही ते सभापती रमेश तवडकर ठरवणार आहेत.









