ज्वलंत विषयांवरुन गाजण्याची शक्यता : चार हजारपेक्षा अधिक प्रश्न,बेकायदेशीर घरे, बांधकामे कायदेशीर करणाऱ्या तीन विधेयकांचा अंतर्भाव
पणजी : राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवार दि. 21 जुलैपासून सुरु होत असून ते विविध ज्वलंत विषयांवरुन गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यासाठी 4 हजारपेक्षा अधिक प्रश्न आले असून त्यात 750 तारांकीत तर 3330 अतारांकीत प्रश्नांचा समावेश आहे. शिवाय गोव्यात अनधिकृत, बेकायदेशीर घरे, बांधकामे कायदेशीर करण्यासाठी तीन विधेयक विधानसभेत सरकारतर्फे मांडण्यात येणार आहेत. सरकारी, कोमुनिदाद व खासगी जमिनीतील घरे, बांधकामे यांचा त्यात अंतर्भाव आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचे दिसून येत आहे. हे अधिवेशन 21 जुलै ते 8 ऑगस्ट असे सलग 15 दिवस चालणार आहे. त्यात अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून प्रश्नोत्तर तास, शून्य तास, लक्षवेधी सूचना, विधेयके अशा विविध कामकाजाचा अधिवेशनात समावेश आहे. विरोधकांची संख्या कमी तर सत्ताधारी आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचे प्रश्न चर्चेला येण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे.
काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी पक्ष यांच्या आमदारात एकी नसल्यामुळे आणि मतभेद असल्यामुळे त्याचा लाभ सरकारी पक्षाला होणार, अशी लक्षणे दिसून येत आहेत. शुक्रवार हा खासगी कामकाजाचा दिवस असून एका दिवसात जास्तीत जास्त 5 खासगी प्रस्तावावर चर्चा होणार आहे. प्रश्नोत्तर सत्रासाठी लॉटरी पद्धतीने प्रश्नांची निवड करण्यात येणार आहे. काही विधेयके वादग्रस्त ठरणार असल्याची शक्यता असून पावसाळी अधिवेशनात काही जुन्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा सरकारचा बेत आहे. अल्पसंख्यांक हक्क सुधारणा विधेयक, शिक्षण, आरोग्यावर आधारित बदल करणारे विधेयक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचे विधेयक सादर करण्याचा सरकारचा इरादा आहे. पिटबूल, सॅटवायलर सारख्या हिंस्र जातीच्या कुत्र्यांचे पालन करण्यावर बंदी घालणारे विधेयक विधानसभेत मांडले जाणार आहे. कारखाना – बाष्पक विधेयक दुरुस्ती विधेयकही सादर करुन त्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. दररोज सकाळी 11.30 वा. अधिवेशन चालू होणार असून ते सायं. 6 वाजेपर्यंत संपवावे असे ठरवले असले तरी अनेकवेळा ते रात्री उशिरापर्यंत चालू ठेवावे लागते.









