हवामान खात्याचा अंदाज : शेतकऱयांना पावसाचे वेध
प्रतिनिधी/ बेंगळूर
शेतकऱयांना मान्सूनचे वेध लागले असून तो केरळ किनारपट्टीच्या समिप आहे. विविध कारणांमुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. राज्यात 5 जून रोजी मान्सून प्रवेश करणार असून अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. यापूर्वी 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तो काही दिवस लांबणीवर पडला आहे.
रविवार किंवा सोमवारी केरळ किनारपट्टीवर नैर्त्रुत्य मान्सून दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पाठोपाठ 5 जून रोजी कर्नाटकात तर 7 रोजी महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश होणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे. पुढील 48 तासात दक्षिण अरबी समुद्रातील काही भाग, मालदिव आणि लक्षद्विपच्या प्रदेशात मान्सून दाखल होईल. तसेच या आठवडय़ात केरळमध्ये मान्सून व्यापण्यासाठी पूरक वातावरण असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे.
असानी चक्री वादळाच्या प्रभावामुळे यंदा अपेक्षेपेक्षा आधीच म्हणजे 16 मे रोजी मान्सूनने अंदमानात प्रवेश केला होता. 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने श्रीलंकेच्या दिशेने कूच केली होती. आता केरळ किनारपट्टीच्या सीमेवर तो दाखल झाला आहे. 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला तर कर्नाटक किनारपट्टीवर 5 जूनच्या आसपास दाखल होईल. 10 जूनपर्यंत तो राज्यभर व्यापेल असे बेंगळूरमधील हवामान खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
2017 मध्ये 30 मे, 2018 मध्ये 29 मे, 2019 मध्ये 6 जून, 2020 मध्ये 5 जून आणि 2021 मध्ये 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. 2017 आणि 2018 मध्ये अंदाजापेक्षा आधी तर 2019 मध्ये 8 जून रोजी, 2020 मध्ये 1 जून रोजी आणि 2021 मध्ये 3 जून रोजी मान्सूनचा केरळमध्ये प्रवेश झाला होता. हवामान खात्याच्या पूर्वसूचनेनुसार यंदा अपेक्षेपेक्षा आधीच केरळ आणि कर्नाटकात मान्सून प्रवेश करणार होता. परंतू वादळी वाऱयांमुळे वातावरणात बदल झाल्याने मान्सून लांबणीवर पडला अशी माहिती हवामान तज्ञ श्रीनिवास रेड्डी यांनी दिली आहे.









