ऑनलाईन टीम / तरुण भारत :
देशात यंदा सर्वसाधारण मान्सून अपेक्षित असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने आज मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. देशात जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल. 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सर्वसामान्य पाऊस म्हटले जाते. महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या उत्तरार्धात ‘एल निनो’चा प्रतिकूल प्रभाव राहण्याची शक्यता असल्याचेही आयएमडीकडून सांगण्यात आले आहे.
अल निनो परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात दिसून येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. उत्तर पश्चिम भारतातील काही भाग, पश्चिम मध्य भारतातील काही भाग आणि ईशान्य भारतातील काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.








