पुढच्या दोन दिवसांत संपूर्ण राज्य व्यापणार
पुणे / प्रतिनिधी
प्रदीर्घ विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाले असून, सोमवारी त्यांनी महाराष्ट्राचा 95 टक्के भाग व्यापला. पुढील दोन दिवसात मान्सून पूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
26 मेनंतर राज्यातून मान्सूनने ब्र्रेक घेतला होता. गेले चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस होत असून, त्यामुळे मान्सूनला गती मिळाली आहे. संपूर्ण उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग व्यापत त्याने गुजरात, मध्य प्रदेश मध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय छत्तीसगढ आणि ओरिसा चा आणखी काही भाग वाऱ्यांनी व्यापला आहे. वेरावल, भावनगर, वडोदरा, खारगोन ,अमरावती, दुर्ग, भारगढ, चांदबली, बालूरघाट अशी मान्सूनची रेषा आहे. पुढील दोन दिवसात मोसमी वारे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसाच्या आणखी काही भागासह, सिक्किम, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश मध्ये दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
कोकण आणि लगतच्या भागावर असलेली हवेची द्रोणीय स्थिती सध्या दक्षिण गुजरात आणि लगतच्या भागावर आहे. यातच अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वाऱ्यात वाढ झाल्याने सोमवारी कोकणासह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. कोकणात अनेक भागात अतिवृष्टीची स्थिती होती, तर मध्य महाराष्ट्रात सोमवारी दिवसभर पावसाची तीव्रता कायम होती. पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा मारा अधिक आहे.
सातारा, कोल्हापूरच्या घाट क्षेत्रात मुसळधारचा इशारा
दक्षिण गुजरातच्या भागावरील या क्षेत्राची तीव्रता वाढून, त्याचे येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे. तसेच हे क्षेत्र उत्तर पश्चिमेच्या दिशेने प्रवास करणार आहे. याच्या प्रभावामुळे मंगळवारी मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातदेखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील अनेक जिह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. राज्यात विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 19 जूनपर्यंत पावसाची तीव्रता कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. यादरम्यान महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छीमारांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे.
आवश्यकतेनुसार धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा :मुख्य सचिव सुजाता सौनिक
पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात तेथे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी. जी पर्यटनस्थळे धोकादायक असतील तेथे मागदर्शक सूचना लावण्याबरोबरच सुरक्षा बंदोबस्त ठेवून दुऊस्ती होईपर्यंत ती पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात यावीत. त्याचबरोबर प्रशासन अथवा पोलीस यंत्रणेच्या सूचनेनंतर देखील दक्षता न घेण़ार्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
पुणे जिह्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आढावा घेतला. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या, पावसाळ्यामध्ये पर्यटक काही पर्यटनस्थळावर मोठ्या संख्येने येतात. अशा ठिकाणी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. पर्यटकांची जीवित हानी होऊ नये यासाठी जी ठिकाणे धोकादायक असतील तेथे बंदोबस्त वाढवून आवश्यकता भासल्यास पर्यटकांना तात्पुरती बंदी घालण्यात यावी. यानंतरही काही पर्यटक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत नसतील तर अशा पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.








