आजही शक्यता, येलो अलर्ट जारी
पणजी : मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून यंदा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संपूर्ण राज्याला पावसाने झोडपून काढले. परिणामी काही भागातील नद्यांच्या पाण्याची पातळी देखील वाढली. आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. गोव्यातील सर्वात मोठा सण गणेश चतुर्थीचा उत्सव असून राज्यात उत्साहाचे वातावरण असतानाच पावसाने मात्र धुमाकूळ घातला. मंगळवारी संपूर्ण गोव्याला पावसाने झोडपून काढले. गेल्या 24 तासांत मान्सून एकदमच निक्रिय होता, मात्र मंगळवारी पहाटेपासून गोव्यात मान्सून फारच आक्रमक झाला आक्रमकतेचा सूर आणखी तीन दिवस आळवणार असल्याचे वृत्त आहे.
पावसाचा वेग वाढल्याने गेल्या 24 तासात गोव्यात जोरदार पाऊस झाला. आणखी तीन दिवस जोरदार पाऊस पडणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक एक इंच पाऊस वाळपई पडला तर धारबांदोडामध्ये पाऊण इंच, काणकोण, पेडणे येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. सांगे, मडगाव व सांखळी येथे प्रत्येकी एक सेंटीमीटर पाऊस पडला. म्हापसा, जुने गोवे, मुरगाव व पणजी येथे अत्यल्प पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासातील सरासरी पाऊस एक सेंटीमीटर एवढा झालेला आहे. 29 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला.









