पुणे / प्रतिनिधी :
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने शनिवारी कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापत कारवारपर्यंत धडक मारली. दरम्यान, मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, येत्या 48 तासांत तो गोवा तसेच महाराष्ट्रात पोहचण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
नैऋत्य मोसमी वारे 8 जूनला केरळात दाखल झाले, त्यानंतर दोन दिवसांत त्याने कर्नाटकात धडक मारली आहे. मान्सूनने शनिवारी मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण केरळ, दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागराचा काही भाग, पूर्वमध्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग, उत्तरपूर्व बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग, उत्तरपश्चिम बंगालच्या उपसागराचा काही भाग, तसेच पूर्वोत्तर भारतातील काही राज्यात प्रवेश केला. कारवार, मरकारा, कोडाईकनाल, अदिरामपट्टणम अशी मान्सूनची रेषा आहे.
महाराष्ट्र, गोव्यात दोन दिवसांत
दरम्यान, मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, येत्या 48 तासांत तो गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, मध्य अरबी समुद्राचा बराचसा भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, दक्षिणपश्चिम व पश्चिममध्य बंगालचा उपसागर, संपूर्ण उत्तर पूर्व बंगालचा उपसागर, उर्वरित पूर्वोत्तर राज्ये, पश्चिम बंगाल तसेच सिक्कीममध्ये प्रवेश करेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यभर वादळी पावसाचा इशारा
कोकण गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस, तर विदर्भात पुढील चार दिवस वादळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
आषाढी वारीसाठी पुणे वेधशाळेची विशेष हवामान सेवा
आषाढी वारीसाठी पुणे वेधशाळेने विशेष हवामान सेवा सुरु केली आहे. यात यात्रेचा मार्ग व त्यावरील हवामान निरीक्षणे, यात्रेचे सध्याचे ठिकाण व हवामान अंदाज, सद्य हवामान स्थिती, हवामान अंदाज व इशारे आदींचा समावेश आहे. पुणे वेधशाळेच्या imdpune.gov.in मध्ये pune weather अंतर्गत ही सेवा देण्यात आली असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एल निनो उद्भवला
दरम्यान, प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती उद्भवल्याचे अमेरिकेतील क्लामेट प्रेडिक्शन सेंटरने म्हटले आहे. यामुळे मान्सूनवर परिणाम होणार आहे. यापूर्वी भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचे म्हटले होते. मात्र क्लायमेट सेंटरच्या अहवालानंतर चिंतेत भर पडली आहे. यामुळे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यावरही परिणाम होणार असून, पाऊस कमी होण्याची शक्यता बळावली आहे.