पुणे / प्रतिनिधी :
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी कोकणाच्या काही भागासह कोल्हापूर, सांगली व्यापत सोलापूरपर्यंत धडक मारली. विदर्भातही मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून, त्याने उपराजधानी नागपूरही काबीज केली आहे.
मान्सून पूर्व तसेच पश्चिम शाखा सक्रिय झाली असून, या शाखांनी आता देशाचा बराचसा भाग व्यापला आहे. गेले काही दिवस पश्चिम शाखा खोळंबली होती. मात्र, याला आता गती मिळाली असून, अलिबाग, कोल्हापूर, सांगली व्यापत सोलापूरपर्यंत धडक मारली, तर विदर्भातूनही मान्सूनची शाखा पुढे सरकली असून, नागपूरपर्यंत मान्सूनने व्यापला आहे. शनिवारी मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशचा बहुतांश भाग, हरियाणा, जम्मू काश्मीर व लडाखचा काही भाग व्यापला.
दोन दिवसांत पुणे-मुंबई काबीज करणार
दरम्यान, पुणे-मुंबईला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शनिवारी या दोन्ही शहरांत पावसाने हजेरी लावली. मात्र, दोन दिवसानंतर हवामान विभाग याची घोषणा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पावसाच्या शिडकाव्याने उन्हाच्या काहिलीत होरपळेल्या राज्याला मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे.
दिल्लीत दोन दिवसांत
मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, तो दोन दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तरप्रदेश. बिहार, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लद्दाखचा आणखी भाग, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, गुजरात, राजस्थान, पंजाब व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
चार दिवस पावसाचे
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात पुढील चार दिवस दमदार पाऊस राहणार आहे. यात कोकण गोवा तसेच विदर्भातील काही जिल्हय़ाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाने दिलासा
यंदा केरळासह कोकणात मान्सूनचे आगमन लांबले. मृग नक्षत्रही अर्धे अधिक कोरडे गेले. त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या. स्वाभाविकच बळीराजा चिंतेत असताना पावसाने कोल्हापूर, सांगली व्यापत सोलापूरपर्यंत धडक दिल्याने दिलासा मिळाला पुणे व परिसरातही शनिवारी पावसाची नोंद झाली. राज्याच्या अन्य भागांतही पुढच्या काही दिवसांत मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.








