सर्वत्र कोसळला, हवामान खात्याची माहिती ; दरवर्षीपेक्षा यंदा सहा दिवस उशिरा आगमन,पुढील 2 दिवसांसाठी ‘एलो अलर्ट’
पणजी : अखेर मान्सून गोव्यातील काही भागात पोहोचल्याचा दावा हवामान खात्याने केला असून कर्नाटकातील कारवारमधून मान्सूनने गोव्यात प्रवेश केल्याचे खात्याने म्हटले आहे. दरवर्षीपेक्षा यंदा तो गोव्यात सहा दिवस उशिराने आल्याचेही खात्याचे म्हणणे आहे. आज व उद्या असे दोन दिवस गोव्यात ‘एलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने कर्नाटक तसेच गोव्याच्या काही भागात आगेकूच केली असून तो कोकणातील काही ठिकाणी, मध्य अरबी समुद्रात तसेच तामिळनाडू, पुडूच्चेरीच्या काही भागात, आंध्रप्रदेशच्या काही ठिकाणात व बंगालच्या उपसागरात पोहोचल्याचे खात्याने नमूद केले आहे. दरवर्षी केरळात साधारणपणे 1 जूनला आणि नंतर गोव्यात 4 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. यंदा मान्सूनला केरळ येथे पोहोचण्यास फार उशीर झाला आणि तो विलंबाने तेथे पोहोचला. त्यामुळे गोव्यातही त्याचे आगमन काही दिवस उशिराने झाल्याचे खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
आज, उद्या ‘एलो अलर्ट’ जारी
खात्याने आज दि. 12 व उद्या 13 जून रोजी ‘एलो अलर्ट’ जारी केला आहे. शनिवार, रविवारी गोव्यातील विविध भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी उकाडा कायम असून त्यातून अजून जनतेची सुटका झालेली नाही.
‘बिपर जॉय’चा धोका टळला
दरम्यान, ‘बिपर जॉय’ हे वादळ गोव्यापासून 700 कि.मी. अंतरावर असून तेथून ते गुजरात किनारपट्टी आणि पाकिस्तानकडे सरकत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तेथे ते वादळ 15 ते 16 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वादळाची तीव्रता कमी होत असली तरी त्याचा धक्का बसू शकतो, असा इशारा खात्याने दिला आहे. गुजरात किनारपट्टीवर पर्यटकांना बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले असून तेथे राहाणाऱ्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुंबईसह गुजरातमध्ये आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि गेलेले असल्यास तातडीने परत यावे, असे खात्याने कळविले आहे.









