पुणे / प्रतिनिधी :
पोषक हवामानाअभावी तसेच बिपोरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची पश्चिम शाखा अद्यापही खोळंबलेली असून, 23 जूननंतर याला गती मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान जून महिन्यात मान्सूनन ओढ दिल्याने या महिन्याची पावसाची तूट उणे 86 टक्क्यांवर पोहोचली असून, अवर्षणाचं संकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत, तर राज्याचा उपयुक्त पाणीसाठाही खालावला असून तो 23 टक्क्यांवर पोहोचल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होत आहे. त्यामुळे ये रे येरे पावसा म्हणण्याची वेळ आता सर्वांवर आली आहे .
8 जूनला केरळात आलेल्या मान्सून 11 जूनपर्यंत तळकोकणात रत्नागिरीपर्यंत पोहोचला खरा मात्र पोषक हवामानाअभावी तो तिथेच खोळंबून पडला आहे. यानंतर आलेल्या बिपोरजॉय चक्रीवादळाने बाष्प खेचून घेतल्याने मान्सूनला गती देणारी यंत्रणाच अद्याप विकसित झाली नाही. बिपोरजॉय चक्रीवादळही बरेच दिवस अरबी समुद्रात घोंघावत राहिले त्यानंतर 16 जूनला ते गुजरातला धडकले. वादळ शमले असले तरी त्याचा परिणाम अद्पाही वायव्य भारतात जाणवत आहे.
दुसरीकडे मान्सूनच्या पश्चिम शाखेने आतापर्यंत केरळ, कर्नाटकाचा 75 टक्के भाग, गोवा तसेच तळकोकणात रत्नागिरीपर्यंत मजल मारली आहे. मात्र, त्याला गती मिळण्यासाठी 23 जूनपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. या तुलनेत मान्सूनची पूर्व शाखा चांगली सक्रिय असून, पूर्वोत्तर राज्ये या शाखेने व्यापलेली आहेत, तर येत्या दोन दिवसांत मान्सून दक्षिणेकडचा काही भाग, पश्चिम बंगाल, बिहार , झारखंड व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
महाराष्ट्र अवर्षणाच्या छायेत; तूट उणे 86 टक्के
1 जून ते 18 जून च्या कालावधीत महाराष्ट्रात केवळ 14.50 मिमी इतका पाऊस झाला आहे. बाकी उणे 86 टक्के इतकी पावसाची तूट आहे.महाराष्ट्रातील सगळे जिल्हेच अवर्षणाच्या गर्तेत सापडले आहेत. पावसाअभावी पेरण्याही खोळंबल्या असून, पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर झाली आहे.
पाणीसाठा 23 टक्क्यांवर
राज्यातील मोठय़ा धरणांचा पाणीसाठा 19 जूनपर्यंत 23.52 टक्क्यांवर पोहोचला आहे . गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 30 टक्के इतका होता. त्यातही अमरातवी विभागात मोठय़ा धरणांत 39.60, औरंगाबादेत 31.41, कोकण 27.37, नागपूर 40.56,नाशिक 27.38, पुणे विभागात 10.24 टक्के इतका पाणीसाठा आहे.
23 नंतर मान्सूनला गती, राज्य व्यापण्यास विलंब
23 जूननंतर मान्सूनला गती मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यातही विदर्भ व्यापण्यास त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे जून कोरडाच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विदर्भात उष्णतेची लाट
विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.








