ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यासाठी एक आनंददायी बातमी आहे. मान्सूनने आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामान विभागाकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
11 जूनला मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल झाला होता. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनचा पुढील प्रवास रखडला होता. विदर्भातील 9 जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं 23 जून रोजी केली होती. त्यानंतर काल सकाळपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. आता मुंबई, ठाणे, सातारा, सांगली कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह विविध जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
आज 25 जूनला मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला. संपूर्ण राज्यासाठी सरासरी ता. 15 जून आहे. मान्सून राज्याची सीमा ओलांडून अजून वर सरकला आहे, असं ट्विट हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केले आहे.
आनंद वार्ता: आज 25 Jun ला मान्सून संपूर्ण #महाराष्ट्र राज्यात दाखल झाला.
संपूर्ण राज्यासाठी सरासरी ता. 15 Jun आहे. मान्सून राज्याची सीमा ओलांडून अजून वर सरकला आहे.
IMD pic.twitter.com/DN7BdCIVbe— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 25, 2023
दरम्यान, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाला आहे.








