वनविभागाने बंदोबस्त करावा ; नागरिकांची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील सालईवाडा, सर्वोदय नगर परिसरात सध्या माकडांच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सुमारे वीस माकडांचा हा कळप परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. ही माकडे विविध फुलझाडे आणि घरांच्या कौलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत, तर काही घरांमध्ये घुसण्याचाही प्रयत्न करत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या माकडांनी सर्वोदय नगर परिसरात सावंतवाडी नगर परिषदेने लावलेल्या शेवग्याच्या झाडांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे. झाडांभोवती कुंपण असूनही, माकडांनी झाडांचे मोठे नुकसान केले आहे. या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले असून, वन विभागाने किंवा नगर परिषदेने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.









