रेस्टॉरंटमध्ये माकड करतात नोकरी
मेहनतीचे उदाहरण दिले जाते तेव्हा जपानच्या लोकांचा उल्लेख अवश्य केला जातो. परंतु जपानमधील केवळ माणसंच नव्हे तर प्राणीही अत्यंत मेहनती असल्याचे सांगितले तर विश्वास ठेवणे काहीच अवघड ठरणार आहे. जगात अजब रेस्टॉरंटची कमी नाही, जपानच्या एका रेस्टॉरंटमध्ये माकडं वेटर म्हणून काम करतात. या कामाकरता या माकडांना पगारही दिला जातो.
जपानच्या एका रेस्टॉरंटचा व्हिडिओ युटय़ूबवर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. काबाकी रेस्टॉरंट हे जगभरात प्रसिद्ध असून त्याचा समावेश अजब रेस्टॉरंटच्या यादीत करण्यात आला आहे. येथे वेटर म्हणून दोन माकडांना जॉब देण्यात आला आहे. हे माकड येथे रेस्टॉरंटमध्ये वेटरचे पूर्ण काम करते. या माकडांना पाहण्यासाठी आणि त्यांनी सर्व्ह केलेले खाद्यपदार्थ खाण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक येत असतात.

जपानच्या टोकियोतील या रेस्टॉरंटने माकड किती हुशार प्राणी आहे हे सिद्ध करून दाखविले आहे. जपानमध्ये प्राण्यांकडून काम करवून घेणे किंवा त्यांचे शोषण करण्यावर बंदी आहे. या गुन्हय़ाकरता तेथे कठोर शिक्षेची तरतूद आहे. याचमुळे या रेस्टॉरंटच्या मालकाने सरकारकडून अनुमती मिळवत माकडांना स्वतःच्या इथे नोकरीवर ठेवले आहे, परंतु याकरता त्याला आठवडय़ात केवळ 2 दिवस माकडांकडून काम करवून घेण्याची अनुमती मिळाली आहे.
या रेस्टॉरंटमध्ये शिरल्यावर ग्राहकांचे स्वागत तेथे नोकरी करत असलेली दोन माकडं करतात. माकडंच मेन्यू कार्ड आणून देते आणि ऑर्डरही घेते. यानंतर सर्व्ह देखील माकडंच करतात. सर्वात खास बाब म्हणजे या माकडांना ऑफिस स्टाफप्रमाणेच रितसर गणवेश परिधान केला जातो. या कामाच्या बदल्यात माकडांना पगार मिळतो. वेतन म्हणून त्यांना त्यांच्या आवडीची फळे दिली जातात.









