कुरळप :
वारणा पट्ट्यातील चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, करंजवडे, देवर्डे, ठाणापुडे आदी गावातून वानरांकडून धुमाकूळ सुरू आहे. हाता तोंडाला आलेल्या शेत पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आंबा पिकाचे अतोनात नुकसान होऊ लागले आहे. खाणे कमी पण नुकसान जास्त असा प्रकार सुरू आहे. उत्पन्नाच्या बाबतीत उपेक्षित असलेल्या शेतकऱ्याला वानरांकडून दिला गेलेला फटकाच आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून शेतातील अनेक पिके तसेच आंबा पिक परिपक्व झाले आहे. त्यातच वानरांचा रानातील मेवा संपत आल्याने त्यांनी गावालगतच्या शेत शिवारामध्ये आसरा घेतला आहे. शेतातील परिकक्व झालेल्या व हाता तोंडाला आलेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
आंबा पिकांच्या झाडावरती वानरांचे कळप दिसत आहेत. वानरांकडून घातल्या गेलेल्या धुमाकुळामुळे आंब्याची फळे खाली पडत आहेत. काही फळे वानरांकडून आर्धी-कच्चे खाऊन खाली टाकून दिली जात आहेत. असे प्रकार अनेक ठिकाणी घडत असून कच्च्या आंब्याच्या कैरी खराब होत आहेत. कच्च्या कैरी वानरांकडून अर्ध्या करून खाली तोडून टाकल्या जात आहेत. मुळात, वानरांच्या या वृत्तीला वैतागून या परिसरातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.
वारणा पट्ट्यातील या गावातून फारच कमी मोठमोठे वृक्ष शिल्लक राहिले आहेत. दुसऱ्या गावात पावसाळ्यात वृक्षारोपण केले तर वृक्ष जगण्याचे प्रमाण फारच कमी आहे. तेही अलीकडे केले जाणारे सर्व वृक्षारोपण उपक्रम हे संकरित स्वरूपाचे वृक्षारोपण करून घेत आहेत. जुन्या काळात लावलेल्या झाडांची उंची व विस्तार हा फार मोठ्या प्रमाणात आहे. पण उंची व विस्तार फार मोठ्या प्रमाणात असलेल्या झाडांची संख्या या परिसरात फारच कमी आहे. महाकाय वृक्षांचा सदुपयोग शेती व शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणात ठरतो आहे.
शेती व शेतकरी उत्पादन व उत्पन्नाला घेऊन गोंधळात आहे. शेती उत्पन्नाला भाव नसल्यामुळे शेती पिकवण्याच्या मानसिकतेत शेतकरी राहिलेला नाही. त्यातच आता जंगली प्राण्यांकडून भाजीपाल्याला, फळ पिकाला वानरांकडून धोका पोहोचू लागला आहे. एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करता शेती व शेतकरी अधोगतीच्या दिशेनेच वाटचाल करताना दिसून येतो आहे.
चिकुर्डेसह करंजवडे परिसरात वानरांकडून शेत पिकांचे नुकसान होत आहे. यावरती शिराळा वनविभागाकडून उपाययोजना करण्यात येऊन शेती व शेतकऱ्याला आधार द्यावा, अशी मागणी वारणा पट्ट्यातील शेतकरऱ्यांमधून होत आहे.








