त्वरित बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
वार्ताहर /नंदगड
नंदगड गावामध्ये माकडांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे दुकानदार, बागायतदार व रहिवासी संतप्त बनले आहेत. माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शंभरहून अधिक माकडांचे दोन कळप नंदगड गावात गेल्या आठवड्याभरापासून धुमाकूळ घालत आहेत. घरांची कौले काढून घरात घुसून घरातील खाद्यपदार्थ खात आहेत. तर नंदगड बाजारपेठेतील व अन्य गल्ल्यातील किराणा व पुलाच्या दुकानात घुसून खायचे पदार्थ पळवून नेत आहेत. हाकेद्वारे हुसकावूनही माकडे दाद देईनात. त्यामुळे लाकूड घेऊन दुकानासमोर थांबण्याची परिस्थिती दुकानदारावर येत आहे. शेवटी वैतागून दुकान बंद करून बसण्याची परिस्थिती येत आहे. नंदगड गावातील काही घरांच्या पाठिमागे केळी, पेरु, लिंबू आदी फळांची झाडे आहेत. ही फळे काढून खाऊन टाकण्याचा प्रकार पहावयास मिळत आहे. परसात सुकत ठेवलेले साहित्यही पळवून नेण्याचा प्रकार माकडांकडून होत आहे. घरातील महिलाही माकडांना हुसकावून लावण्यापेक्षा माकडे कळपाने येत असल्याने घाबरत आहेत. त्यामुळे माकडांचे आयते फावले आहे. या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









