अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे सोपविले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
26 वर्षे जुन्या एका प्रकरणी सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. अमेरिकेत लपलेली एक आर्थिक गुन्हेगार लवकरच भारतात आणली जाणार आहे. सीबीआयने आर्थिक गुन्हेगार मोनिका कपूरला अमेरिकेत स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. सीबीआयची टीम कुठल्याही क्षणी मोनिका कपूरसमवेत भारतात पोहोचणार आहे.
मोनिका कपूर ही 26 वर्षांपासून फरार होती, अमेरिकेच्या न्यायालयाने तिच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. मोनिका कपूरवर 16 बनावट परवान्यांद्वारे कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. तसेच तिच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी झाली होती.
मोनिका कपूरवर बनावट दस्तऐवजांच्या मदतीने आयात-निर्यातीत कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तिच्या विरोधात दिल्ली येथील न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते आणि आता ती ‘प्रोक्लेम्ड ऑफेंडर’ घोषित झाली आहे.
1999 मध्ये मोनिका कपूर आणि तिचे दोन बंधू राजन अन् राजीव खन्नाने मिळून बनावट आयात दस्तऐवज तयार केले, या बनावट दस्तऐवजांच्या मदतीने त्यांनी भारत सरकारकडुन 16 ‘रिप्लेनिशमेंट लायसन्स’ प्राप्त केले, यातील 14 लायसन्स त्यांनी एका दुसऱ्या कंपनीला विकले, या कंपनीने याचा वापर करत कुठल्याही सीमाशुल्काशिवाय सोने आयात केली. या हेराफेरीमुळे भारत सरकारचे सुमारे 6.8 लाख डॉलर्स म्हणजेच 5.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
याप्रकरणाचा तपास 1999 मध्ये डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेन्सने सुरू केला होता. सप्टेंबर 1999 मध्ये कपूरची चौकशीही झाली होती. मग 2002 मध्य हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. 2003 मध्ये दिल्लीच्या न्यायालयाने मोनिका कपूर विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. यानंतर 2004 साली या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले. अनेकदा नोटीस जारी होऊनही मोनिका न्यायालयासमोर हजर न राहिल्याने फेब्रुवारी 2006 मध्ये न्यायालयाने तिला ‘प्रोक्लेम्ड ऑफेंडर’ गुन्हेगार घोषित केले होते. भारत सरकारने मोनिका कपूरच्या शोधासाठी इंटरपोलकडे मागितली होती. 2003 मध्ये इंटरपोलने कपूरच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.









