कोल्हापूर :
कसबा बावडा येथील ड्रेनेज लाईनच्या कामाचे बिल काढण्यासाठी महापालिकेत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त यांच्यापासुन लिपिकापर्यंत सर्वांना पैसे दिले असल्याचा गौप्यस्फोट ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याने पत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकारमध्ये कोणत्या अधिकाऱ्याला किती रुपये दिले याची माहिती वराळे याने दिली आहे. 30 हजारपासुन 1.60 लाख रुपयांपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना रक्कम दिली असल्याची माहिती वराळे याने पत्रकातून दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, प्रभाग क्रमांक दोन कसबा बावडा पूर्व बाजू अंतर्गत जाधव घर ते बडबडे मळा ड्रेनेज पाईपलाईन टाकणे सदर कामातील पाचवे रनिंग बिल 85 लाख रुपये घेतले असा आरोप करण्यात आला आहे. मात्र हे पाचवे बिल रक्कम जीएसटी सोबत 72 लाख 16 हजार 396 रुपये 50 पैसे इतकी होते. ती माझ्या महापालिकेमधील नोंदणीकृत युनियन बँक चालू खाते क्रमांकावर 24 डिसेंबर 2024 रोजी महापालिकेच्या खात्यावरून 67 लाख 58 हजार तीन रुपये इतकी रक्कम जमा झाली. शासन नियमावलीनुसारच हे बिल मला मिळाले आहे. यामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही.
बिलांपैकी 800 एमएम पाईपचे 1125 रनिंग मीटर काम पूर्ण असून 18 चेंबर्स पूर्ण आहेत. 312 मीटर पाईप जागेवरती उपलब्ध होत्या त्यापैकी जानेवारी ते मे 2025 पर्यंत जागा उपलब्ध होईल त्यानुसार 70 ते 80 मीटर काम पूर्ण केले आहे. कामाचे व्हिडिओ वेळोवळी अधिकाऱ्यांना पाठवले आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे काम थांबले. याची कल्पना संबंधित महापालिका अधिकारी यांना दिली. त्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढू अशी ग्वाही दिली होती. कामाचे पैसे परत जाणार म्हणून मला बिलामध्ये झालेल्या कामाची व थोडी ऍडव्हान्स रक्कम अदा करण्यात आली आहे. कामाचे अद्याप 93 लाख रुपये बिलाची रक्कम महापालिकेमध्ये शिल्लक आहे. महापालिकेमध्ये 2017 पासून काम करतोय माझे कसबा बावड्या मधील पॅवेलियन ग्राउंड विकसित करणे, कसबा बावडा स्मशानभूमी, गटरची कामे यांची बिले काढतानाही मी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना बिल काढण्यासाठी त्यांनी मागणी केलेल्या पैशाची पूर्तता केली असल्याचे वराळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
- सरनोबत यांना रोख अडीच लाख दिले
ठेकेदार राहूल पाटील यांनी माझ्dया विरोधात केलेल्या तक्रारीचा फायदा घेत तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी मला ब्लॅक लिस्ट न करण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले असल्याचे आरोप वराळे यांनी पत्रकार केला आहे. कावळा नाका परिसरात रोख स्वरुपात त्यांना हि रक्कम दिले असल्याचे वराळे यांनी म्हटले आहे.
- अधिकाऱ्यांना 60 लाख रुपये दिले
महापालिकेत आज पर्यंत केलेल्या सात ते आठ कोटींच्या कामाची बिले काढण्यासाठी आत्तापर्यंत मनपा अधिकाऱ्यांना टक्केवारीच्या स्वरुपात 60 ते 65 लाख रुपये दिले असल्याचे वराळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
- अधिकाऱ्यांनीच पत्र लिहून घेतले
या प्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांनी मला राजारामपुरीमध्ये बोलावून घेतले व तुम्ही पत्र द्या आम्ही तुम्हाला वाचवू नाहीतर तुमच्यावरती पोलीस केस व तुमचे महापालिकेमध्ये असणारे 40 ते 50 लाख रुपये डिपॉझिट परत करणार नाही असे सांगितले. त्यामुळे मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या हस्ताक्षरामध्ये पत्र लिहून त्याच ठिकाणी दिले असल्याचे वराळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
- मुख्यमंत्री यांना चौकशीसाठी पत्र
या प्रकरणी माझ्यासह संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, या मागणीचे पत्र मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे, मनपा प्रशासक यांना ई-मेल द्वारे दिले असल्याचेही वराळे यांनी म्हटले आहे.
- कोणत्या अधिकाऱ्यांना किती रुपये दिले
कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड 1 लाख 20 हजार, उपशहर अभियंता कांबळे 60 हजार, तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत 1 लाख 20 हजार, अकाऊंट विभाग क्लार्क नाईक, अधीक्षक सूर्यवंशी 6 हजार, ऑडिट विभागामधील लिपिक यांना लाखाला शंभर, लेखापरीक्षक परीय यांना लाखाला दोनशे, मुख्य लेखा परीक्षक मिसाळ यांना लाखाला दोनशे याप्रमाणे एकूण 30 हजार रुपये दिले आहेत. तर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांना 60 हजार रुपये दिले असल्याचे वराळे यांनी पत्रकात म्हटले आहे.








