प्रयागराज महाकुंभमधून स्वत:च्या सुंदर नेत्रांनी मोहून टाकणारी मोनालिसा प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ती आता चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. हिंदी चित्रपट ‘द डायरी ऑफ मणिपूर’मध्ये ती यापूर्वीच काम करत आहे. याचदरम्यान तिला एक दाक्षिणात्य चित्रपट मिळाला आहे. व्हायरल गर्ल मोनालिसा मल्याळी चित्रपट ‘नागम्मा’मध्ये दिसून येणार आहे.
मोनालिसा ही आगामी मल्याळी चित्रपटात काम करण्यासाठी तयार आहे. अलिकडेच तिने चित्रपटाच्या पूजा सोहळ्यात भाग घेतला. मोनालिसाने सोशल मीडियावर याची छायाचित्रेही शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये तिच्यासोबत अभिनेता कैलास दिसून येत आहे. चित्रपटात ती त्याची नायिका असणार आहे. कार्यक्रमात चित्रपट निर्माते सिबी मलयिलही उपस्थित होते.
पी. बीनू वर्गिस या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर जीली जॉर्ज या चित्रपटाचे निर्माते आहेत. नागम्मा चित्रपटात मोनालिसा महत्त्वपूर्ण भूमिकेत असेल. मोनालिसा ही इंदोरपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरील महेश्वर येथील रहिवासी आहे. ती प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ दरम्यान सोशल मीडिया सेंसेशन ठरली होती. मोनालिसा तेथे हार विकण्याचे काम करत होती, परंतु स्वत:च्या सुंदर नेत्रांमुळे ती आकर्षणाचे केंद्र ठरली होती. नागम्मा चित्रपटाचे चित्रिकरण चालू महिन्यात होणहर आहे.









