न्यायमूर्ती अंबादास जोशी यांचे प्रतिपादन : समृद्धी केरकर हिचा सन्मान
पणजी : निसर्ग तुम्हाला क्षणोक्षणी शिकवत असतो मात्र त्यासाठी डोळे आणि कान सतत उघडे ठेवायला हवेत. लेखकांनी पूर्वसंचित आणि या जन्मीची निरीक्षणे याचे अनुबंध जोडायला हवेत, असे मत लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी येथे व्यक्त केले. ’निसर्ग संवेदना’ या निसर्ग कन्या समृद्धी केरकर हिच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचे द्वितीय मानांकन लाभल्याबद्दल मंगळवारी तिचा साहित्य लेणी प्रतिष्ठान ताळगाव या संस्थेतर्फे येथे सन्मान करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती अंबादास जोशी बोलत होते. गोसासे मंडळ सभागृहात झालेल्या या सोहळ्यात,त्यांच्या हस्ते समृद्धी केरकर हिला शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख वत्ते सव्यसाची समीक्षक,लेखक डॉ.सोमनाथ कोमरपंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कायदा मंत्री ऍड रमाकांत खलप, साहित्य लेणी च्या चित्रा क्षीरसागर व प्रकाश क्षीरसागर ही मंडळी उपस्थित होती. समृद्धीचे वडील पर्यावर्णीय कार्यकर्ते तथा लेखक, राजेंद्र केरकर व आई लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तथा लेखिका पौर्णिमा केरकर यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
मराठी भाषेचे वैभव आम्हाला लाभले आहे याकडे निर्देश करून अंबादास जोशी म्हणाले, मराठीतील शब्द संदर्याची तुलना होऊ शकत नाही. त्यांनी समृद्धीचा गौरवपूर्ण उल्लेख निसर्गातील अनुभव लिहीत रहावे अशी सदिच्छा दिली. डॉ. कोमरपंत यांनी, समृद्धीवर आई वडिलांच्या वात्सल्याची पाखर असल्याचे सांगून त्यांच्या प्रज्ञा, प्रतिभा व परिश्रमातून ती घडली आहे व तिच्या लिखाणातून भावसमृद्धीचा प्रत्यय येतो असे नमूद केले. ते म्हणाले, मराठीचे संचित गोव्याला आपतहा लाभले आहे. पोर्तुगीजांनाही मराठीची परंपरा मोडता आली नाही.लक्ष्मीकांत भेंब्रे यानी पोर्तुगीजपूर्व मराठीचा इतिहास लिहून ठेवला आहे.संपूर्ण भारतात मराठी व बंगाली या भाषा समृद्ध भाषा मानल्या जातात.समृद्धी साहित्य अकादमी पुरस्कारासाठीच्या नामांकनात दुसरी ठरली याला गोमंतकीय मराठी सहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार देत नाही हे कारण असावे.मराठीची इथे परंपरा असून तिच्यावर अन्याय का? मराठी भाषा इथे उपरी नाही हे पुन्हा पुन्हा सांगावे लागते. गोमंतकात निसर्गावर आज आक्रमण होत आहे .समृद्धीने निसर्ग अनुभवातून लिहीत रहावे. इंदू परब व सृष्टी नाईक यांनी निसर्ग संवेदना मधील उतारे वाचून दाखवले. शुभदा च्यारी, विभव गावकर यांनी मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला. चित्रा क्षीरसागर यांनी स्वागत केले. प्रकाश क्षीरसागर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.रजनी रायकर यांनी सूत्रसंचालन केले तर शर्मिला प्रभू यांनी आभार मानले.









