शिरवळ :
शिरवळ (ता. खंडाळा) येथे महिलेच्या अंगाला स्पर्श करत अश्लील हावभाव करत विनयभंग केल्याप्रकरणी एका महिलेने शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. तक्रार दाखल होतात तक्रारीचे गांभीर्य ओळखून शिरवळ पोलिसांनी तीन तासाच्या आतच संशयित शुभम दिलीप गुळमे (वय 24 रा. शिरवळ मूळ रा. माळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडील दुचाकी जप्त केली आहे.
शिरवळ (ता. खंडाळा) गावातील साईसुपर मार्केट जवळ कच्चा रोडवर संशयित शुभम दिलीप गुळवे हा त्याच्या मोटरसायकल (क्र. एम एच 42 ए यू 6 872) वरून तोंडाला मास्क लावून आला व गाडी स्लो करून एका हाताने फिर्यादीच्या शरीरास स्पर्श करून पुढे जाऊन अश्लील इशारे करीत फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले. याप्रकरणी संबंधित महिलेने शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, घडलेल्या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे व त्यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बाबी तपासत विनयभंगाच्या गुह्यातील आरोपीचा शोध घेत शुभम दिलीप गुळमे यास ताब्यात घेत त्याने गुह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. फिर्यादी महिलेने शुभम गुळमे व ती दुचाकी ओळखली आहे.
आरोपी शुभम गुळमे याने असेच कृत्य काही महिलेसोबत केले असल्याचे नाकारता येत नाही. तरी या प्रकारचे कृत्य ज्या महिलांसोबत झाले असेल त्यांनी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेल्या महिला उपपोलीस निरीक्षक नयना कामथे मो. 8180951617 व सपना दांगट मो. 9545650600 यांच्याशी संपर्क साधावा. आपले नाव व पत्ता व इतर माहिती गोपनीय ठेवली जाईल असे आवाहन शिरवळ पोलिसांनी केली आहे.








