ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोषींना १५ ऑगस्ट २०२२ रोजी चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर तुरुंगातून सोडून दिलं. त्यावरून तीव्र पडसाद उमटले होते. मात्र, याच दोषींपैकी एकाने १९ जून २०२० रोजी पॅरोलवर तुरुंगाबाहेर असताना एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
२००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करून तिच्या तीन वर्षीय मुलीसह कुटुंबातील १४ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात ११ आरोपी दोषी सिद्ध झाले. या गुन्ह्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, १४ वर्षे तुरुंगवासानंतर गुजरात सरकारने दोषींना चांगल्या वर्तणुकीच्या आधारे सोडून दिलं. यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. गुजरातमधील भाजपा सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवरही यावरून टीका झाली. परंतु, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ११ दोषींपैकी एकावर आणखी एक विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. यावरील प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे.
हे ही वाचा : समता पक्षाची याचिका हायकोर्टाने फेटाळली
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कैद्यांची सुटका करण्याचे आदेश केंद्र सरकारने एका विशेष धोरणाद्वारे राज्यांना दिले होते. परंतु या धोरणातून बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या आरोपींना वगळण्यात आले होते. असे असताना बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका करण्यात आल्याचे सांगत विरोधकांनी गुजरात तसेच केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. तथापि, ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याचा भाग म्हणून कैद्यांना सूट देण्याच्या परिपत्रकानुसार या दोषींची मुक्तता करण्यात आलेली नसल्याचे गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.