निवडणूक प्रचाराला दिले प्राधान्य : सीबीआयकडूनही होणार चौकशी
वृत्तसंस्था /कोलकाता
कॅश फॉर क्वेरी प्रकरणी ईडीने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांना गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु आपण कृष्णानगर लोकसभा मतदारसंघात प्रचार करत असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याचे मोइत्रा यांनी कळविले आहे. ईडीने यापूर्वी देखील मोइत्रा यांना दोनवेळा समन्स बजावला होता, परंतु त्यांनी यापूर्वी देखील अधिकृत कामाचा दाखला देत चौकशीसाठी उपस्थित राहणे टाळले होते. ईडी महुआ मोइत्रा यांची विदेशी चलन अधिनियमाच्या उल्लंघनाप्रकरणी चौकशी करू इच्छित आहे. याचबरोबर काही विदेशी आर्थिक व्यवहार आणि एका एनआरआय खात्याशी निगडित देवाणघेवाणीचीही तपास यंत्रणा चौकशी करणार आहे. महुआ यांच्यासोबत ईडीने व्यावसायिक दर्शन हीरानंदानी यांना समन्स जारी करत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी दर्शनचे वडिल निरंजन हीरानंदानी हे मुंबई येथील तपास यंत्रणेच्या कार्यालयात उपस्थित राहिले होते. मागील वर्षी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोइत्रा यांच्यावर गंभीर आरोप केला होता. महागड्या भेटवस्तू आणि पैशांच्या बदल्यात व्यावसायिक दर्शन हीरानंदानीच्या निर्देशानुसार मोइत्रा यांनी अदानी समूह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. मोइत्रा यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचाही आरोप होता. यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या नीतिमत्ता समितीकडे वर्ग करण्यात आले होते. या समितीच्या चौकशीत महुआ मोइत्रा या दोषी आढळून आल्या होत्या. यानंतर मोइत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आले होते.
सीबीआयकडूनही चौकशी
तृणमूलच्या माजी खासदार मोइत्रा यांच्या विरोधात सीबीआय देखील तपास करत आहे. कॅश फॉर क्वेरी प्रकरणी हा तपास होत आहे. लोकपालच्या निर्देशानंतर सीबीआयने तपास हाती घेतला आहे. मोइत्रा यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा की नाही याचा निर्णय सीबीआय तपासाच्या आधारावर घेणार आहे.









