क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेल्या लढतीत मोहन बागान सुपर जायंट्सने आणखी एक विजय नोंदविताना ओडिशा एफसीचा एकमेव गोलने पराभव केला. काल ही लढत कोलकाताच्या विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर खेळविण्यात आली.
जाद वेळेतील खेळाच्या तिसऱ्या मिनिटाला दिमित्रीयोस पॅत्रातोसने मानवीर सिंगच्या पासवर मोहन बागानचा विजयी गोल केला. या जेतेपदाने मोहन बागानने यंदाच्या हंगामातील शिल्ड जेतेपद निश्चित केले आहे. त्यांचे आता 22 सामन्यांतून 16 विजय, 4 बरोबरी व 2 पराभवांनी 52 गुण झाले.
दुसऱ्या स्थानी असलेल्या एफसी गोवाचे 21 सामन्यांतून 42 गुण झाले आहेत. मोहन बागानचे दोन सामने शिल्लक आहेत. एफसी गोवाने उर्वरीत तीन सामन्यांत जरी विजय मिळविला तर त्यांचे 51 गुण होतात. बागान पराभूत जरी झाला तर त्यांचे शिल्ड जेतेपद निश्चित आहे.









