वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
मोहन बागान सुपर जायंटने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर एएफसी चषक 2023-24 मधील गट ‘ड’च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात 10 जणांनिशी खेळणाऱ्या ओडिशा एफसीवर 4-0 ने मात केली. दिमित्री पेट्राटोसने दान गोल केले. त्याशिवाय सहल समद आणि लिस्टन कुलासो यांनीही प्रत्येकी एक गोल नोंदविला.
सातव्या मिनिटाला मोहन बागानने गोलसाठी केलेल्या पहिल्या प्रयत्नामुळे सामन्याची सुरुवात चांगली झाली. यावेळी मनवीर सिंगचा आदळून वळलेला फटका अडविण्यासाठी अमरिंदर सिंगला प्रयत्न करणे भाग पडले. एएफसी कपमध्ये पदार्पण केलेल्या ओडिशाला 13 व्या मिनिटाला आघाडी घेतल्याप्रमाणे वाटले होते. त्यावेळी कार्लोस देल्गादोने पुरविलेला पास रॉय कृष्णाने जवळून रूपांतरित केला होता. पण हा गोल नाकारला गेला. अहमद जाहौह, मूर्तदा फाल आणि कृष्णा असूनही ओडिशाला मोहन बागानच्या दिमित्री पेट्राटोस, आर्मांदो सादिकू आणि ह्युगो बॉवमस यांच्याकडून गोलसाठी केले जाणारे प्रयत्न थोपविणे जड गेले.
त्यातच 42 व्या मिनिटाला मूर्तदा फालला दुसरे पिवळे कार्ड दाखविल्यानंतर ओडिशाच्या खेळाडूंची संख्या कमी होऊन 10 वर आल्याने त्यांना मोठा धक्का बसला. परंतु या सुपर कप विजेत्यांनी तरीही मध्यांतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राखला. पण मोहन बागानने संख्येच्या दृष्टीने वरचढ असल्याचा फायदा घेण्यात वेळ वाया घालवला नाही आणि मध्यांतरानंतर एका मिनिटात समदने गोलक्षेत्रातून फटका हाणत त्यांचे खाते उघडले.
या गोलने मोहन बागानला प्रोत्साहन दिले आणि पेट्राटोसच्या जागरूकतेमुळे त्यांचा दुसरा गोल झाला. यावेळी समदचा अडविलेल्या फटक्यावर परतलेला चेंडू त्याने जाळीत सारला. बरोबरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही ओडिशा संघ आणखी मागे पडला. कारण त्यांना तीन मिनिटांच्या कालावधीत दोन गोल स्वीकारावे लागले. मनवीर सिंगने 79 व्या मिनिटाला दिलेला चेंडू कुलासोने जाळीत सारला. त्यानंतर पेट्राटोसने मोइरांगथेम थोयबाच्या खराब बॅक पासचा फायदा घेत आपला दुसरा गोल केला.









