रेवा संस्थानात 116 वर्षांनंतर राजकन्येने दिला मुलाला जन्म
‘देवभूमी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंड सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज आजोबा झाल्यामुळे त्यांच्या संस्थानात आनंदाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या सर्वात मोठय़ा संस्थानांपैकी एक असलेल्या रीवा संस्थानात 116 वर्षांनंतर ‘पुत्ररत्न लाभा’ची संधी आली आहे. बघेल घराण्याचे महाराज आणि रीवा संस्थानाचे 35 वे महाराजा पुष्पराज सिंह जुदेव यांची कन्या मोहिना सिंग यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. सध्या महाराजा पुष्पराज सिंह जुदेव यांचे पुत्र दिव्यराज सिंह जुदेव हे मध्यप्रदेशातील रीवा जिल्हय़ातील सिरमौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. तर महाराजा पुष्पराज सिंह जुदेव हे स्वतः काँग्रेस सरकारमध्ये माजी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
रीवा राजघराण्यातील मुलगी आणि टीव्ही कलाकार मोहिना सिंग हिने मुंबईत मुलाला जन्म दिला आहे. यानंतर उत्तराखंडमध्ये तिच्या सासरपासून ते वडिलोपार्जित रीवा राजघराण्यापर्यंत आनंदाचे वातावरण आहे. सिरमौरचे भाजप आमदार आणि रीवा राजघराण्याचे युवराज दिव्यराज सिंह यांनी ‘गुडन्यूज’ देत आमचे संपूर्ण कुटुंब मुंबईत मोहिना सिंह यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यांची प्रसूती मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाली. आमच्या राजघराण्यात असा प्रसंग 116 वर्षांनंतर आल्याचेही त्यांनी नमूद केले. याआधी 1906 मध्ये महाराजा व्यंकट रमण सिंह यांच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. तिचे नाव होते राजकुमारी सूदर्शन. सूदर्शन कुमारी यांचा विवाह 1922 मध्ये बिकानेरचे राजकुमार शार्दुल सिंह यांच्याशी झाला होता.
मोहिनाचे लग्न सतपाल महाराज यांचा मुलगा सुयश रावत यांच्याशी झाले होते. इतिहासानुसार, मोहिना ही स्वातंत्र्यापूर्वी रीवा राज्यातील 35 वे महाराजा पुष्पराज सिंह जुदेव यांची मुलगी आहे. 2019 मध्ये तिचे लग्न हरिद्वार येथील सुयश रावतसोबत झाले होते. सुयश हा उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री आणि आध्यात्मिक गुरू सतपाल सिंह महाराज यांचा मुलगा आहे.