लवकरच राज्यात होणार विधानसभा निवडणूक
वृत्तसंस्था/ चंदीगड
भाजपने मंगळवारी सोनिपत जिल्ह्यातील राई मतदारसंघाचे आमदार मोहनलाल बडौली यांची हरियाणा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दीर्घकाळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले बडौली हे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची जागा घेणार आहेत. सैनी हे यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष होते. बडौली यांचा अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता तरीही पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी सोपविली आहे.
मोहनलाल बडौली यांनी सोनिपत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु काँग्रेस उमेदवार सतपाल ब्रह्मचारी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. हरियाणा निवडणुकीपूर्वी भाजपने बडौली यांना प्रदेशाध्यक्ष करत ब्राह्मण मतपेढीला स्वत:सोबत आणण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. राज्यात मुख्यमंत्री हा ओबीसी समुदायातील, पक्षाचे प्रदेश प्रभारी डॉ. सतीश पुनिया हे जाट समुदायाचे आहेत. तर प्रदेशाध्यक्ष म्हणून ब्राह्मण नेत्याची निवड करत भाजपने जातीय संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीत बडौली यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चुरशीची लढत देत 10 पैकी 5 जागा जिंकल्या होत्या.
खट्टर, मुख्यमंत्री सैनींचे निकटवर्तीय
मोहनलाल बडौली हे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि वर्तमान मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचे निकटवर्तीय मानले जातात. 1989 पासून मोहनलाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. संघाचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. मोहनलाल बडौली यांचे पक्ष प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर मुख्यमंत्री सैनी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राई या विधानसभा मतदारसंघात विजयी होणारे बडौली हे भाजपचे पहिले नेते ठरले होते. राज्यात आगामी काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप 2014 पासून राज्यात सत्तेवर आहे. अशा स्थितीत सत्ताविरोधी भावनेचे आव्हान भाजपला पेलावे लागू शकते.









