वृत्तसंस्था/ कोलकाता
103 व्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात डेव्हिडच्या निर्णायक गोलाच्या जोरावर मोहमेडन स्पोर्टींगने भारतीय नौदलाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून आपला पहिला विजय नोंदवला.
या सामन्यात डेविडने 50 व्या मिनिटाला मोहमेडन स्पोर्टींगचे खाते उघडले. 69 व्या मिनिटाला मोहमेडन स्पोर्टींगचा दुसरा गोल फेनाईने केला. डेविडने दिलेल्या पासवर फेनाईने हा गोल नोंदवला. भारतीय नौदलातर्फे एकमेव गोल पी. एम. ब्रिटोने 97 व्या मिनिटाला केला. या विजयामुळे आता मोहमेडन स्पोर्टींगने या स्पर्धेत आपले खाते उघडताना दोन सामन्यातून तीन गुण मिळवले आहेत. या गटात मुंबई सिटी एफसी संघ सहा गुणासह पहिल्या स्थानावर आहे. शुक्रवारच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता.









