वृत्तसंस्था / दुबई
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज तसेच आयर्लंड महिला संघातील अष्टपैलू ओर्ला प्रेंडरगास्ट यांची आयसीसीतर्फे ऑगस्ट महिन्यातील अनुक्रमे सर्वोत्तम पुरूष आणि महिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय कसोटी संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या संघाला केवळ विजयच मिळवून दिला नाही तर त्याने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवण्यात मोलाचे योगदान दिले. या शेवटच्या सामन्यामध्ये सिराजने एकूण 9 गडी बाद केले. या कामगिरीमुळे आयसीसीतर्फे मोहम्मद सिराजची ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली.
ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी आयर्लंडच्या अष्टपैलू ओर्ला प्रेंडरगेस्टची निवड करण्यात आली. आयर्लंडमध्ये झालेल्या पाकविरुद्धच्या टी-20 मालिकेत प्रेंडरगेस्टने फलंदाजी करताना 144 धावा तर गोलंदाजीत 4 गडी बाद करत ‘मालिकावीराचा बहुमान मिळविला. महिलांच्या विभागात सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कार शर्यतीमध्ये पाकची यष्टीरक्षक आणि फलंदाज मुनीबा अली आणि नेदरलँड्सची वेगवान गोलंदाज इरिस झ्वीलिंग यांचा समावेश होता. पण प्रेंडरगेस्टने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत आयसीसीचा हा पुरस्कार पटकाविला. आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक युरोप पात्र फेरीच्या स्पर्धेत प्रेंडरगेस्टने गोलंदाजीत 7 गडी बाद केले तर फलंदाजीत तिने 244 धावा जमविल्या होत्या.









