मोहम्मद शमीनं बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन केलंय अन् चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यानं दणक्यात सुरुवात केली ती 5 बळी मिळवून…शमीचं महत्त्व सध्या जास्तच वाढलंय ते जसप्रीत बुमराह उपस्थित नसल्यानं. मात्र त्याच्या डोक्यावर अजूनही दुखापतीची तलवार लोंबकळत असल्यानं चिंता दूर झालेल्या नाहीत…
भारताच्या ‘त्या’ अनुभवी जलदगती गोलंदाजाला टाचेला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर वाटलं होतं की, त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपलीय…परंतु ‘त्याला’ निराश केलं नाही ते देशाचं प्रतिनिधीत्व करण्याच्या तीव्र इच्छेनं…‘त्याची’ टाच दुखावली ती 2023 मध्ये भारतानं आयोजित केलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना नोव्हेंबर महिन्यात…मग ‘त्याला’ तोंड द्यावं लागलं ते शस्त्रक्रियेला. त्यात डाव्या गुडघ्याची भर पडल्यानं प्रकरण जास्तच चिघळलं. विश्वचषक स्पर्धेत यशस्वी ठरल्यानंतर अचानक ‘ऑपरेशन टेबल’वर झोपण्याची पाळी येणं म्हणजे जबरदस्त मानसिक झटकाच…त्यानंतर ‘त्याच्या’वर प्रसंग आला तो तब्बल 14 महिने न खेळता मैदानाबाहेर बसण्याचा…
‘त्या’ 34 वर्षीय गोलंदाजानं हल्लीच पुनरागमन केलं ते इंग्लंडविरुद्धच्या ‘टी-20’ व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून. आता जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत सध्या ‘त्याच्या’वर फार मोठी जबाबदारी आहे ती भारतीय गोलंदाजांच्या फौजेचं नेतृत्व करण्याची…मोहम्मद शमी…दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्ताननं आयोजित केलेल्या ‘चॅम्पियन्स चषक’ स्पर्धेतील पहिल्या लढतीत शमीनं तास्किन अहमदला गारद करून एकदिवसीय सामन्यांत सहाव्यांदा पाच बळी मिळविण्याचा पराक्रम नोंदविला आणि भारतानं बांगलादेशचा सहा गडी राखून सहज खात्मा केला…त्यानंतर त्यानं आकाशाच्या दिशेनं पाहिलं अन् ‘फ्लाईंग कीस’ देत आनंद साजरा केला. ही बाब पत्रकारांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही नि अपेक्षेप्रमाणं त्याविषयी त्याला प्रश्नही विचारण्यात आला…
मोहम्मद शमीचं उत्तर होतं, ‘मी माझे 2017 साली वारलेले वडील तौसिफ अली यांना ही कामगिरी अर्पित केलीय. कारण ते माझे ‘रोल मॉडेल’ व त्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिला’…10 षटकांत 53 धावा देऊन 5 बळी मिळविणाऱ्या शमीचं कौतुक करताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, भारतीय जर्सीमध्ये त्याला पाहणं ही नेहमीच उत्साहवर्धक बाब…रोहितच्या प्रशंसेला उत्तर देताना त्यानं सांगितलं, ‘कर्णधार वा प्रशिक्षक यांचा एखाद्या खेळाडूवर विश्वास असणं अतिशय गरजेचं. कारण त्यामुळं चॅम्पियन्स चषकसारख्या मोठ्या स्पर्धेत आखलेल्या डावपेचांची अंमलबजावणी करणं सोपं जातं. शिवाय मनालाही समाधान मिळतं. मी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु सर्व गोष्टी असतात त्या ‘उप्परवाल्या’च्या हातात. नशिबात जे असतं तेच मिळतं. मी सदैव माझ्यावर जी जबाबदारी सोपविण्यात येते ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय’…
या कामगिरीनं मोहम्मद शमीला मान दिला तो एकदिवसीय सामन्यांत डावांचा विचार करता भारतीय गोलंदाजांमध्ये 200 बळी सर्वांत जास्त गतीनं मिळविण्याचा. 103 डावांमध्ये हा प्रताप गाजविणाऱ्या या गोलंदाजानं त्यासाठी लागलेल्या 133 डावांचा विक्रम मोडला तो सध्याचे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचाच. शमीनं झहीर खानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धांत सर्वाधिक 59 बळी खिशात घालण्याच्या विक्रमालाही मोडीत काढलंय. पण त्यानं कधीही विक्रमांना फारसं महत्त्व दिलेलं नाहीये. मोहम्मद शमीनं म्हटलंय की, त्याला खेळताना त्यांची कल्पना देखील नव्हती. प्रत्येकाच्या जीवनात असे क्षण यायलाच हवेत’…
2023 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात शमीनं सात लढतींत 24 बळींची नोंद केली होती. त्याच्या मते, प्रत्येक व्यक्तीला आपला फॉर्म टिकविणं महत्त्वाचं वाटतं. परंतु तसं किती दिवस शक्य होईल हे सांगणं कठीण…त्यानं नेहमीच स्वत:ला प्रश्न विचारलाय तो देण्यात आलेली भूमिका चोखपणे पार पाडलीय की नाही हा. देशी स्पर्धांत पश्चिम बंगालचं प्रतिनिधीत्व करणारा मोहम्मद शमी म्हणतो की, सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत त्याचं सारं लक्ष आहे ते बळी मिळविण्यावर. कारण त्याचा लाभ मिळेल तो संघालाच…‘मी सदैव माझ्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलाय. गंभीर दुखापतीतून बाहेर पडल्यानंतर मी स्वत:लाच अनेक प्रश्न विचारले. मी लक्ष्य गाठण्यास किती उत्सुक आहे, मी ते पुन्हा कसं साधणार, परत पूर्वीची लय मिळविणं शक्य आहे का वगैरे वगैरे. मला वाटतंय की, खेळाडू नेहमीच भुकेलेला असायला हवा’…
पुनरागमन करण्यापूर्वी शमी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रोज तब्बल आठ तास सराव करायचा. खेळताना त्याचं लक्ष केंद्रीत झालेलं असतं ते सामन्यातील परिस्थितीवर आणि तो नेहमीच त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आलाय…सध्या त्याच्या खांद्यांवरील भार वाढलाय तो जसप्रीत बुमराहची उणीव जाणवत असल्यानं…बुमराहनं क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपांत असाधारण गोलंदाज म्हणून आपली विलक्षण दहशत निर्माण केलीय. त्याला 2024 चा सर्वोत्तम ‘आयसीसी पुऊष क्रिकेटपटू’ नि सर्वोत्कृष्ट ‘आयसीसी पुऊष कसोटी खेळाडू’ हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आलेत ते उगाच नव्हे…
त्यामुळं सध्याच्या घडीला जसप्रीतची जागा भरून काढणं हे सोपं काम नाहीये. शमीची ताकद देखील काही कमी नसून बुमराहच्या उदयापूर्वी संघाचं मुख्य हत्यार होतं ते तेच. 2023 च्याच नव्हे, तर 2019 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात सुद्धा त्यानं गुजरातच्या त्या गोलंदाजाला मागं टाकलं होतं. असं असलं, तरी आता परिस्थिती बदललीय, समोरील आव्हानं जास्त खडतर झालीत ती दुखापतीच्या सावटामुळं…बांगलादेशविरुद्धच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा सामना करताना मोहम्मद शमीकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण एकही बळी त्यात त्याच्या हाती लागू शकला नाही…
उलट शमीला पहिल्या षटकात पाच वाइड चेंडू टाकल्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचं षटक टाकणाऱ्या इरफान पठाण (2006 मध्ये वेस्ट इंडिजविऊद्ध 11 चेंडूंचं षटक) नि झहीर खान (2003 साली ऑस्ट्रेलियाविऊद्ध 11 चेंडूंचं षटक) यांच्या पंक्तीत जाऊन बसावं लागलंय…खेरीज चॅम्पियन्स चषकाचा विचार करता पहिल्या षटकातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वाइड. यापूर्वी 2004 साली इंग्लंडविऊद्ध झिम्बाब्वेच्या तिनाशे पानयानगाराने सात वाइड चेंडू टाकण्याचा उच्चांक नोंदविला होता…पण चिंता त्यापेक्षा जास्त वाढल्याहेत त्या दुखापत पुन्हा उफाळून येण्याच्या भीतीनं…
पाकिस्तानविरुद्ध शमी त्याच्या सुऊवातीच्या स्पेलनंतर टाचेला धरून मैदानाबाहेर गेला. यामुळं लगेच त्याच्या तंदुऊस्तीबद्दल प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहिले नाहीत…जरी त्यानं मैदानात परत दाखल होऊन आठ षटकं टाकली अन् त्यात एकही बळी न मिळविता 43 धावा दिलेल्या असल्या, तरी त्याची अस्वस्थता जाणवल्याशिवाय राहिली नाही…त्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यरनं मोहम्मद शमी ठीक असल्याचं सांगितलं खरं, पण मैदानातून तो लंगडत बाहेर जात असल्याचं दृश्य पाहून न्यूझीलंडविऊद्धच्या शेवटच्या गट सामन्यात भारतानं त्याला खेळविण्याचा धोका पत्करावा का यावर चर्चा सुरू झालीय…‘चॅम्पियन्स’ची बाद फेरी जवळ येत असताना पूर्ण तंदुरुस्त मोहम्मद शमी भारताच्या ताफ्यात राहणं हे जेतेपदाच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं !
सामन्यांचा विचार केल्यास सर्वांत जास्त वेगानं 200 बळी…
- गोलंदाज देश सामने
- मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया 102
- साकलेन मुश्ताक पाकिस्तान 104
- मोहम्मद शमी भारत 104
- ट्रेंट बोल्ट न्यूझीलंड 107
- ब्रेट ली ऑस्ट्रेलिया 112
- अॅलन डोनाल्ड दक्षिण आफ्रिका 117
- वकार युनूस पाकिस्तान 118
चेंडूंचा विचार केल्यास सर्वाधिक गतीनं 200 बळी…
- गोलंदाज चेंडू
- मोहम्मद शमी 5126
- मिचेल स्टार्क 5240
- साकलेन मुश्ताक 5451
- ब्रेट ली 5640
- ट्रेंट बोल्ट 5783
89 ‘वनडे’नंतर एक तुलना…बुमराह व शमीची !
- गट जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी
- बळी 149 162
- सरासरी 23.55 25.75
- निर्धाव षटकं 57 45
- चार बळी 6 9
- पाच बळी 2 1
- स्ट्राईक रेट 30.7 27.5
– राजू प्रभू









