वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तो सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात उपलब्ध होऊ शकणार नाही, असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.
अलिकडेच मोहम्मद शमीने मुस्तक अली करंडक येथील स्पर्धेत आपले पुनरागमन बंगाल संघाकडून केले. या स्पर्धेत त्याने 9 सामने खेळले. त्यामुळे त्याला कदाचित ऑस्ट्रेलियाला पाठविले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण सध्या चालु असलेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शमी तंदुरुस्तीच्या समस्येमुळे खेळू शकला नाही. त्याच्या गुडघ्यावर यापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पुन्हा त्याला गुडघ्याला सूज येत असल्याचे दिसून आल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या निर्णयामुळे बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात खेळू शकणार नाही.









