वृत्तसंस्था / राजोरी (जम्मू काश्मिर)
दिल्लीतील ग्रेटर नोयडा येथे सुरू असलेल्या उपकनिष्ठांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत जम्मू काश्मिरचा नवव्या इयत्तेत शिकणारा मुष्टीयोद्धा मोहम्मद यासीरने सुवर्णपदक पटकाविले.
मोहम्मद यासीरचे कुटुंब गरीबी परिस्थितीशी अद्यापही झगडत आहे. मोहम्मदच्या वडिलांचा त्याच्या बालपणीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याची आई मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी जेवण बनविते. या कठीण परिस्थितीतून तिने आपल्या मुलांना शिक्षण तसेच मुष्टीयुद्ध क्षेत्रातही आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद नियमीत मुष्टीयुद्धचा सराव करीत असून त्याला चांगले मार्गदर्शकही लाभले आहेत. खेलो इंडिया अंतर्गत मोहम्मदला या क्षेत्रात आपली चमक दाखविण्याची संधी मिळाली.
उपकनिष्ठांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत 55 किलो वजन गटामध्ये जम्मू काश्मिरचे प्रतिनिधीत्व करताना मोहम्मद यासीरने आपल्या सर्व म्हणजे पाचही लढती जिंकून सुवर्णपदक मिळविले.









